गोपाळ काला - गोकुळाष्टमी - Marathi Article

कृष्णाचं साऱ्या गोकुळाशी प्रेमाचं नातं होतं. कृष्ण साऱ्या गोकुळचा, गौळणींचा लाडका कान्हा होता. ज्या कान्हावर अवघं गोकुळ निरतिशय प्रेम करत होतं त्या गोकुळाला भयमुक्त करून...

गोपाळ काला - गोकुळाष्टमी - Marathi Article

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी या तिथीला रोहिणी नक्षत्रावर श्री कृष्णाचा जन्म झाला . 
अगदी जन्माला येण्या आधीपासूनच त्याला मारण्याची तयारी राजा कंस करतच होता. असं म्हणतात की , श्री राम कधी हसले नाहीत आणि श्री कृष्ण कधी रडला नाही .

मनुष्यकारातला विष्णुचा पहिला अवतार म्हणजे वामन.
वामनाने तीन गोष्टी केल्या .
त्या तिन्ही गोष्टी भगवान श्रीकृष्णानं उचलल्या.
तत्वज्ञानाला चुकीच्या मार्गावरून परत मूळ जागेवर आणणं, शुद्ध आणि शास्त्रीय विचारधारा प्रस्थापित करणं आणि नैतिक अधिष्ठान निर्माण करणं , या त्या तीन गोष्टी..!
असा श्रीकृष्ण आपणाला संदेश देतो “उठा आणि अन्यायाविरुद्ध लढायला सज्ज व्हा!”
गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारे, त्यांची सेवा करून रक्षण कृरणारे .! 
थोडक्यात ही सामान्य जनता..! 

यामध्ये काही गोप आणि गोपिका शरीरानं व्यंग असलेलेही होते पण त्यांनाही कृष्णाने जवळ केले. आजही त्या गोपाळांचे नाव घेतल्या शिवाय “गोपाळ काला ” आणि कृष्ण जन्म कथा पूर्ण  होत नाही..!

गोकुळांत उत्पादित होणारे सर्व  दूध, दही, ताक  लोणी ,   मथुरेला रांजण भरभरून नेऊन दिलं जायचं..!
राक्षसांनी ते खायचं, धष्टपुष्ट होवून उन्मत्त व्हायचं आणि पुन्हा गोपालांवरच अत्याचार करायचा , हा प्रकार  वर्षानुवर्षे चालु होता. या अन्यायाला श्री कृष्णानेच प्रथम वाचा फोडली. आपण गाई राखायच्या, चरायला घेऊन जाणं, पाणी पाजण्यासाठी यमुनेवर नेणं, धारा काढणं,  शेण काढणं, गोठ्याची झाडलोट वगैरे सर्व प्रकारचे कष्ट करायचे...!


सकस असा गोरस मिळवायचा आणि त्यावर आपला मात्र  अजिबात  हक्क नाही...? 
दूध , दही , लोणी हा आपल्या कष्टातून तयार झालेला सकस आहार गोपाळांना मिळाला नाही तर गोकुळ सुदृढ व सशक्त होणार तरी कसे...?
यासाठी पहिला उठाव या गोपालकृष्णाने केला.


कृष्णानं सर्व मथुरेला जाणार दूध, दही, लोणी बंद करण्यासाठी सवंगड्यांना प्रेरीत केलं . त्यांना अन्यायाची जाणीव करून दिली. सर्वांना संघटित केले. मग शिंकाळ्यावरचं लोणी गोपाळांच्या मदतीनं थर रचून फस्त करणं, दह्याच्या हंडी फोडणं, गौळणींचे दह्यादुधाचे माठ फोडणे हे प्रकार सुरू करून पालकांनाही आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून दिली...

गाई राखायला गेल्यानंतर त्या वनामधे शारिरीक व मानसिक बल वाढवणारे खेळ खेळायचे, मल्लविद्या, कुस्ती, लाठीकाठी अशा प्रकारचे युद्धप्रसंगी उपयुक्त ठरणारे खेळ खेळायचे, यमुनेच्या विशाल पात्रामधे पोहायचे अशा रितीने शक्तीची एक प्रकारे उपासना झाल्यानंतर शरीराच्या सदृढतेसाठी पोषक आहार म्हणून दूध, दही, लोणी भक्षण करायचे हा नित्यक्रम सुरू झाला....!

राक्षसानी किंवा शत्रूंनी आक्रमण केलेच तर त्याला तोंड देण्यासाठी आपले शरीर आणि मन दोन्हीही सक्षम असले पाहिजे यासाठी योग्य आहार आणि व्यायाम याची गरज श्री कृष्णाने आपल्या सर्व सवंगड्यांना पटवून दिली....!
कृष्णाचं साऱ्या गोकुळाशी प्रेमाचं नातं होतं. कृष्ण साऱ्या गोकुळचा, गौळणींचा लाडका कान्हा होता. ज्या कान्हावर अवघं गोकुळ निरतिशय प्रेम करत होतं त्या गोकुळाला भयमुक्त करून, त्यांचं संरक्षण करण्यासाठी व गोर गरीब, गोकुळवासीयांना नाहक त्रास देणाऱ्या असुरी वृत्तीचा कायमचा बंदोबस्त करावा लागणार याची त्याला जाणीव होती. गोकुळातील आपलं वास्तव्य कमी काळासाठी आहे हे कृष्ण जाणून होता. मग आपल्या पश्चात गोकुळाचे संरक्षण होण्यासाठी व त्यांना सक्षम करण्यासाठी अवघ्या गोकुळ वासियांना त्यांच्या न्याय्य हक्कांची जाणीव करून दिली. त्यांना आत्मनिर्भर बनवले...!


सध्या या दहिहंडीचे झालेले राजकीय बाजारीकरण, बाह्यसजावट, पैशांची उधळपट्टी , उंचच उंच दहीहंडीचे मनोरे आणि यांतून होणारी जीवघेणी  स्पर्धा गोपाळांचा जीव घेणारी ठरते. यातून भगवंतांच्या मूळ संकल्पनेलाच धक्का पोहोचत आहे. यामध्ये  श्रीकृष्णाला अपेक्षित असलेला शरीराने आणि मनाने सदृढ असा समाज यातूंन खरंच निर्माण होतोय का याचा विचार खूप महत्त्वाचा ठरतो...!
नाही का...?

सौ. संगीता थोरात, नवीन मुंबई