होळी म्हणजे आपल्या मराठी महिन्याप्रमाणे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला येणारा अनेक रंगांचा उत्सव. होळी पेटवण्यासाठी प्रत्येक घरातून लाकडे जमा केली जातात, त्यानंतर सर्वजण एकत्र येऊन होळीची पूजा करतात व होळी पेटवतात. अनेक वर्षापासून आपण सर्वजण अशा प्रकारे होळी साजरी करत आलो आहोत. मात्र बदलत्या काळाबरोबर आपले पारंपारिक उत्सव साजरे करण्यामागे आपल्या पूर्वजांनी डोळ्यासमोर जे उद्देश ठेवली होती , ती हळूहळू काळाच्या आड जात आहे.
आपल्या सर्वांना होळी साजरी करण्यामागे प्रचलित असलेली पौराणिक कथा बर्यापैकी माहीती आहे. भक्त प्रल्हाद जो कृष्णाचा भक्त होता. मात्र हे प्रल्हाद चे वडील हिरण्यकश्यप ह्या राक्षसाला मान्य नव्हते. म्हणून त्याने भक्त प्रल्हादास ठार मारण्यासाठी अनेक योजना बनवल्या त्या सर्व निष्फळ झाल्यानंतर शेवटचा उपाय म्हणून हिरण्यकश्यपची बहीण होळीका भक्त प्रल्हादला जाळण्यासाठी आगीमध्ये स्वतः मांडीवर घेऊन बसते. कारण तिला ब्रह्मदेवाने आगीपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे वरदान दिलेले असते.
मात्र या ठिकाणी प्रल्हाद निश्चिंत होऊन तिच्या मांडीवर बसलेला असतो आणि ती स्वतः आगीत जळते, तेव्हा होळीका ब्रह्मदेवाचे अहावान करून आपले वरदान खोटे का ठरले असे विचारते .
त्यावेळी स्वतः ब्रह्मदेव तिला सांगतात की, आगीपासून संरक्षण करण्याचे वरदान मी तुला दिले होते. ते फक्त तुझे स्वतःचे रक्षण करण्यासाठी इतरांना जाळण्यासाठी नाही. तुला दिलेल्या वरदानाचा तू दुरुपयोग केला आहे, या ठिकाणी तु स्वतः आगीमध्ये प्रवेश केला त्यामध्ये कोणाचा काहीच दोष नाही. यावरून मानवजातीला एक खूप मोठा संदेश मिळाला आहे आणि तो म्हणजे दुसऱ्याचे आपण वाईट चिंतन करणे म्हणजे आपल्या स्वतःचे नुकसान आपण स्वतः करून घेणे, अशावेळी देव सुद्धा आपली मदत करू शकत नाही. या गोष्टीची सर्वांना आठवण राहावी म्हणून अनेक वर्षापासून आपल्याकडे होळी हा सण साजरा केला जातो.
होळी हा सण साजरा करण्याची पद्धत प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी विशेष पुरणपोळी बनवली जाते. तर बिहार ,उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये खवा घालून विशेष पाकाच्या कारंजा बनवल्या जातात त्यांना ( गुंजीया) असे म्हणतात. तसेच या दिवसा करीता विशेष कपड्यांची खरेदी देखील केली जाते. होळीच्या दिवशी अनेक इतर गोड-धोड पदार्थ देखील घरात बनवले. नवीन कपडे परिधान करून अनेक वेगवेगळ्या गोड पदार्थाचा नैवेद्य होळीला अर्पण करून होळी साजरी केली जाते. त्यानंतर संध्याकाळी सर्वजण एकत्र येऊन घरात बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतात. तर अशा प्रकारे साजरा केला जाणारा होळी हा सण. यावर्षी आपण सर्वजण कोणत्या प्रकारे साजरा करणार आहोत, याची कल्पना जवळजवळ आपल्या सर्वांना आहे .
आपल्या अवतीभवती असलेली सध्याची परिस्थिती पाहता यावर्षी आपण सर्वांनी एकत्र येऊन होळी साजरी करणे जरी शक्य नसले आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत असलेले आपले मतभेद ,त्यांच्या बद्दल असलेल्या आपल्या अपेक्षा, तसेच आपल्या सर्वांच्या व स्वतःच्या मनातील अनेक नकारात्मक विचार यांची एक यादी बनवून सर्वजण होळीच्या पावन दिवशी ही यादी कायमची जाळून टाकुयात. कारण जोपर्यंत नकारात्मक विचारांची होळी जळत नाही तोपर्यंत आपण सर्वजण आपल्या जीवनात सकारात्मक रंगांचा धुलीवंदन साजरा करू शकत नाही.
खरं आहे ना...!!
नक्कीच विचार कराल...!!!
आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!!
पुनम सुलाने
जालना