महाशिवरात्रीचे महत्व

आपल्या पूर्वजांनी आपल्याला आपल्या हिंदू परंपरेत व्रत आणि सणांच्या माध्यमातून जीवन कसे जगावे याचा खूप मोठा ठेवा दिला आहे चला तर जाणून घेऊया महाशिवरात्री च्या दिवशी होणाऱ्या पूजेचे महत्त्व.

महाशिवरात्रीचे महत्व

महाशिवरात्रि म्हणजे महादेवाची रात्र प्रत्येक वर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीचे महत्त्व खूप जास्त आहे. सर्व भक्त आपल्या आपल्या श्रद्धेनुसार या दिवशी दिवसभर उपवास तसेच ज्या ठिकाणी महादेवाची पिंड असते त्या ठिकाणी जाऊन महादेवाची मनोभावे पूजा करतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व भक्तजन रात्रभर भजन कीर्तन करून जागरण करतात तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी महाशिवरात्रीचा उपवास सोडला जातो. याच पद्धतीने वर्षानुवर्ष साजरा होणाऱ्या महाशिवरात्री सणाचे जसे अध्यात्मिक महत्त्व आहे तसेच वैज्ञानिक महत्त्वदेखील खूप आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला आपल्या हिंदू परंपरेत व्रत आणि सणांच्या माध्यमातून जीवन कसे जगावे याचा खूप मोठा ठेवा दिला आहे चला तर जाणून घेऊया महाशिवरात्री च्या दिवशी होणाऱ्या पूजेचे महत्त्व.

सर्वप्रथम जाणून घेऊया ज्योतिर्लिंगा बद्दल संपूर्ण विश्व निर्माण करणाऱ्या परमपिता परमात्मा चे प्रतीक म्हणजेच ज्योतिर्लिंग. या महादेवाच्या ज्योतिर्लिंगा वरती सर्वप्रथम जल, दूध-दही तूप, मधाचे अभिषेक केले जाते याचा अर्थ ज्याप्रमाणे जल, दूध-दही, तूप, मध यामध्ये शीतलता, मधुरता, आणि स्निग्धता असते अशीच मधुरता, शीतलता आणि स्निग्धता आपल्या सर्वांच्या जीवनात देखील असावी. यानंतर विभूतीचे तिलक महादेवाला लावले जाते त्याच पद्धतीने आपल्याला देखील आपण एक पवित्र आत्मा आहोत याचा तिलक कायमस्वरूपी स्मरणात असायला हवा. इतर देवी देवतेवर प्रमाणे महादेवाच्या पिंडीवर सुगंधित फुल फळे न वाहता ह्या दिवशी धोत्र्याचे फळ आणि फुल महादेवाला अर्पण केले जाते धोत्रा हा एक विषारी फळ आहे तरीदेखील ते महादेवाला अर्पण करण्यामागे विशेष हेतु म्हणजे आपल्याला जीवन जगताना मान-अपमानाचे, नकारात्मकतेचे विष प्राशन करावे लागत असेल तरी देखील आपल्याला आपले जीवन सहज आणि सरळ बनवता यायला हवे. अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण बेलपत्र महादेवाला अर्पण करण्यामागे मुख्य हेतू आपल्याला देखील अनेकांच्या उपयोगी पडता येईल असे सर्वगुणसंपन्न आपले जीवन बनवता यायला हवे. 

त्याचप्रमाणेच महादेवाला अनेक ठिकाणी भांग देखील अर्पण केली जाते व प्रसाद म्हणून देखील अनेक ठिकाणी भांग वाटली जाते तसे पाहता भांग हा एक नशा चढवणारा पेय आहे. मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी याचे महत्त्व म्हणजे आपल्या सर्वांच्या बुद्धीमध्ये कायमस्वरूपी परमेश्वररुपी अदृश्य शक्ती नेहमी माझ्यासोबत आहे असा एक नशा असायला हवा त्यामुळे आपल्याला जीवनात कधीच एकटे वाटणार नाही आणि आपले जीवन निर्भय मुक्त होईल हा मुख्य हेतू आहे. त्यानंतर रात्रभर जागरण करण्यामागे आपल्या बुद्धीचे जागरण आपण कायम स्वरूपी असू द्यावे आपल्याला नेहमी चांगले आणि वाईट यामधील अंतर करता यायला हवे तसेच आपल्यामधील पाच विकारांचा नाश करून अज्ञानरूपी अंधारात ज्ञानरूपी ज्योती स्वरूप परमात्म्याचे आगमन आपल्या बुद्धीत व्हावे असा मुख्य हेतू आहे. तर मग आहे ना खरोखरच ही महाशिवरात्री आपल्या सर्वांसाठी आपल्या हिंदू सनातन धर्माने आपल्याला दिलेली ही खूप मोठी देणगी.
नक्कीच विचार कराल...!!
आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा..!

poonam-sulane

पुनम सुलाने, जालना