पोळा सणाच्या निमित्ताने.....

पोळा असा सण जो आजही आपल्या महाराष्ट्रात खूप छान पद्धतीने साजरा केला जातो.

पोळा सणाच्या निमित्ताने.....

पोळा असा सण जो आजही आपल्या महाराष्ट्रात खूप छान पद्धतीने साजरा केला जातो. फरक फक्त इतका आहे की पूर्वी प्रत्येक जण इतका श्रीमंत नव्हता की बैलजोडी विकत घेऊ शकेल तरीही ज्यांच्याकडे थोडीफार शेती असायची अशा प्रत्येकाकडे आपली स्वतःची बैलजोडी असावी अशी धडपड कायम राहायची आताच्या काळात परिस्थिती जरी बदलली असली तरी खूप कमी कुटुंब अशी आहेत ज्या ठिकाणी गाई गुरांनी भरलेला गोठा पाहायला मिळतो.. कारण "जनावर म्हटली की जीवाला जाळ"... असे म्हणत अनेक ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांकडे फक्त गरजेपुरतेच जनावरे शिल्लक राहिली आहे. त्यातून बैलजोडी म्हणजे वर्षातून ठराविक दिवसासाठी कोणाकडून रोजदारी देऊन आणली जातात त्यामुळे कुटुंबातील माणसांसारखी जपली जाणारी जनावरे काळाबरोबर फक्त गरजेपुरते आणली जातात... हे आजचे वास्तव आहे बऱ्याच शेतकरी कुटुंबासाठी.. त्याला अनेक कारणे आहेत त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे कोणाकडे माणसांची चौकशी करण्यासाठी वेळ नाही त्यातून इतक्या जनावरांची देखरेख करणे म्हणजे इतके सोपे नाही. असो,,बराच काळ झाला आम्हालाही अनेक दिवसांपासून बाहेर राज्यात असल्यामुळे पोळ्याच्या सणाला मनात इच्छा असूनही गावाकडे जाता येत नाही तरी जेव्हा आपल्या गावाकडे हे सण साजरे केले जातात तेव्हा आमच्या लहानपणी साजरे केले जाणाऱ्या सगळ्या सणांची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि विशेष म्हणजे  वर्णन केलेल्या कवितेतील माझे वडील आणि आजोबा दोघेही राहिलेले नाहीत तरी प्रत्येक वर्षी अगदी उत्साहाने पोळ्याचा सण साजरा करणाऱ्या आपल्या माणसांची पोळ्याच्या निमित्ताने विशेष आठवण आल्यापासून राहत नाही....

आठवणीतील पोळा.... 

पोळा आला की,राज्या,नंदया,
हरण्या आणि तोफण्या यांची 
आठवण आल्यावाचून राहत नाही 

तीस-पस्तीस एकर माळरानाचा
कधी मळा झालाच नसता
संसाराच्या संघर्षात जर 
माझ्या बापाला त्यांचा आधार नसता 

रात्री बेरात्री आजोबा 
आजारी पडायचे
तमा न करता जिवाची
अंधाऱ्या पावसात ते धावायचे 

वाचावा जीव आजोबांचा म्हणून 
किती घाईने चालायचे?
बापाने जे काही ठेवलं समोर 
किती आनंदाने खायचे ! 

वर्षातून एकदा दिवस 
त्यांचाही यायचा 
दिसावी वेगळी जोडी म्हणून
बाप पोळ्याचा बाजार करायचा 

हळूहळू बदलत गेलं सारं
कोणाकडेच वेळ आता राहिली नाही
न राहिला भरलेला तो भरगच्च गोठा
मायेची ती माणसेही राहिली नाही 

खरच पूर्वी पोळा या सणाचे 
महत्व खूप मोठे असायचे
घरातल्या माणसासारखे
बैल जोडीला जपले जायचे 

टेकडीवर गावाच्या थाटाने
बैल पोळा भरवला जायचा
पुरणाच्या पोळीचा घास
नैवेद्य म्हणून भरवला जायचा 

आधुनिकतेच्या काळात माणसांचा 
उपयोग गरजेपुरता झाला आहे
तेथे ह्या मुक्या भावना समजण्यास
कोणाकडे ना वेळ राहिला आहे 

आठवणीतला पोळा आठवताना
आठवणी डोळ्यापुढे उभ्या राहतात 
पडद्याआड गेलेल्या सर्व आठवणी
पुन्हा एकदा जिवंत होतात..

Poonam Sulane

✍पूनम सुलाने-सिंगल