श्रावणी अमावास्या अर्थातच पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. कोकणात हा सण आषाढात तर देशात काही ठिकाणी हा सण भाद्रपद अमावस्येलाही साजरा करतात. या सणाला 'बेंदूर' असेही नाव आहे.
या दिवशी शेतकरी सकाळीच आपल्या बैलांना तेल लावतो. त्याला स्वच्छ आंघोळ घालतो. त्याच्या शिंगाला रंग लावतो बेगड लावून ते सुशोभित करतो. अंगावरही विविध प्रकारची नक्षी किंवा आकृत्या काढतो, अंगावर झूल घालतो, शिंगांना बाशिंगे बांधतो, गळ्यात घुंगरूपाळा घालतो. पायातही माळा घालतो. त्यांना सजवून झाले की, मग त्याची पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. संध्याकाळी वाजंत्री लावून त्यांची मिरवणूक काढतात त्यांना देवदर्शनाला घेऊन जातात. इतर लोकही या दिवशी मातीचे बैल तयार करून त्याची पूजा करतात. त्यांना नैवेद्य दाखवतात, अशा तऱ्हेने हा दिवस बैलाच्या पूजेचा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे.
आजही शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे स्थान फार मोठे आहे. शेतीसाठी यंत्राचा वापर आजकाल बराच होत असला तरी सामान्य गरीब शेतकऱ्याला ते परवडत नाही. त्यांचे जीवन बैलांवरच अवलंबून असते. शेतीच्या सर्वच कामात शेतकऱ्याला त्याची मदत होत असते. त्यामुळे त्याला आपले दैवत मानून वर्षातुन एकदा त्याला विश्रांती देणे, त्याची पूजा करणे, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे अगदी योग्य आहे. त्यामुळेच अती प्राचीन काळापासुन बैलाच्या उपासनेची प्रथा अलीकडे दिसून येते.
मोहेनजोदरो संस्कृती किती तरी प्राचीन आहे. तेथील उत्खननात बैलाची चित्रे सापडली आहेत. शंकराचे वाहन नंदी आहे. यावरून प्राचीन काळापासून आपण बैलांना मान देतो. त्यांन पूजनीय मानतो असे म्हणता येईल. आपल्या देशात खिलारी, डांगी अशा बैलाच्या जाती अनेक आहेत, त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. बैलपोळ्याच्या निमित्ताने आपण कृषी जीवनातील अशी विविध माहिती मिळवली पाहिजे खेड्यात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तो सण प्रत्यक्ष अनुभवता आला तर तो प्रत्यक्ष आनंद आपल्यालाही उपभोगता येईल.
आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. इथली बहुतांश जनता खेड्यात राहते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय. इथले जीवन शेतीवरच अवलंबुन आहे. या शेतीकामात शेतक-याला बैलांची साथ संगत लाभत असून बैलच शेतकऱ्याचे सोबती आहेत. या बैलांच्या मदतीने शेतकरी भर तळपत्या उन्हात शेताला पाळ्या घालून ठेवतो. नांगरणी, वखरणीची कामे तो आटोपतो. एवढधात जून महिना उजाडतो मृग नक्षत्राला सुरूवात होते. हळुहळु पावसाला सुरुवात होते. त्याचबरोबर ग्रामदैवतांच्या नावाने चांग भले करून त्यांचा मानसन्मान करून कुणबी दादा तिफन उचलतो व पेरणी सुरू होते. पावसाची झड जोरात सुरू होते व बैलांना आपोआप विसावा मिळतो मग शेतकरी राजा आपल्या देवाचा सण साजरा करतो त्याला 'पोळा' म्हणतात. त्याच्याविषयी एक कथा सांगितली जाते.
कथा
एकदा काय झाले ! कैलासपर्वतावर शंकर पार्वती सारीपाट खेळत होते शेवटी पार्वतीने डाव जिंकला पण शंकरदेव म्हणाले 'डाव मी जिंकला!" दोघात वाद सुरू झाला त्याला साक्षी होता फक्त नंदी. जवळच उन्हात असलेल्या नंदीला पार्वतीने विचारले 'काय रे, डाव कुणी जिंकला' त्यावेळी नंदीने शंकराचीच बाजू उचलुन धरली. झाले, पार्वती एकदम रागावली. तिने नंदीला शाप दिला "मृत्युलोकी तुझ्या मानेवर 'जू' बसेल, तुला जन्मभर कष्ट होतील." शापवाणी ऐकून नंदीला आपली चूक उमगली. त्याने पार्वती मातेचे पाय धरले व उ:शाप मागितला. तेव्हा पार्वतीला नंदीची दया आली, तिने उःशाप दिला "शेतकरी वर्षातून एकदा देव मानून तुझी पूजा करतील या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाहीत." तेव्हा पासून शेतकरी हा पोळा सण साजरा करतात अशी कथा आहे.
शेतकरी अन्नधान्य पिकवतो, त्यावर मानव जगतो म्हणुन त्याला जगाचा पोशिंदा, अन्नदाता किंवा शेतकरी राजा म्हणतात. हे धान्य ज्याच्या जीवावर तो पिकवतो तो बैल म्हणजे त्याचे देव आहेत. बैलपोळा या सणाचे शेतकऱ्यांच्या जीवनात फार महत्व आहे. वर्षभर आपल्या साथसंगतीने रात्रंदिवस मातीत काबाडकष्ट करणाऱ्या मुक्या प्राण्याचे, बैलाचे सर्व सोपस्कार करायचे सोहळे पुरवायचे, ज्या पाठीवर अनेकदा चाबकाचे फटकारे दिलेले असतात त्यावर आज मायेने हात फिरवायचा असा हा सण.
तसेच श्रावण वद्य अमावस्येला दर्भगृहणी अमावस्याही म्हणतात. त्या दिवशी दर्भ उपटून आणायचे असते. हरितने हेमाद्रीमध्ये म्हटले आहे. या दिवशी आणलेले दर्भ नि:सत्य होत नाहीत म्हणून ज्या दिवशी उपयोगात आणावयाचे असेल त्या दिवशी आणु शकतो. या दिवशी पिठोरी व्रत करतात. हे व्रत खान्देश व मध्यप्रदेशात 'पोळा' नावाने प्रसिध्द आहे.
स्त्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्रपौत्रवती बनवणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते. एका स्त्रीचा पुत्र मृत जन्मला होता म्हणून वनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून, पुत्र जिवंत व्हावा अशी प्रार्थना केली. तिची प्रार्थना फळाला आली आणि योगिनींच्या आशीर्वादाने तिचा पुत्र जिवंत झाला. अशी भविष्यपुराणात एक कथा आहे. आई ही केवळ बालकाची नाही तर त्याच्या संस्कारांची देखील जननी आहे. आपल्या संस्कृतीने मातेचा फारच मोठा गौरव केलेला आहे. 'मातृदेवो भव' असे म्हणुन तिला आद्यपूजनाचे स्थान दिलेले आहे. जे हात पाळणे हालवतात ते हात जगावर शासन करतात. "जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगा उध्दरी" ही म्हण मातृमहिम्याचे गुणगान करते. माता ही प्रेमाची अतुलनीय मूर्ती आहे. स्वत: ओल्या जागेत झोपून मुलाला कोरड्या जागेत झोपवणान्या आईच्या वात्सल्याची जगात उपमा मिळणे कठीण. आई म्हणजे सतत वाहणारा प्रेमाचा झरा! अशा रितीने आईमध्ये भगवान पहायचे सांस्कृतीक दुष्टीने प्रयत्न सुरू करून भगवंतातच आई निरखण्याची आध्यात्मिक दृष्टी देणारा हा "मातृदिनाचा उत्सव म्हणजेच पोळा" आपण खऱ्या समजुतीने समाजात पुन्हा जिवंत केला पाहिजे.