बहीण भावाच्या अतुट नात्याचा उत्सव रक्षाबंधन

राखीपौर्णिमेच्या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि त्याच्याकडून ओवाळणी घेते. जगातील एक सुंदर नातं म्हणजे बहिण भावाच असतं.

बहीण भावाच्या अतुट नात्याचा उत्सव रक्षाबंधन

अगदी पूर्वापार चालत आलेला लहान थोर सर्वांना मनापासून आवडणारा अगदी प्रिय सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणलं की आपल्याला आठवतं बहिण भावाच दृढ नातं. बहिण लहान असो वा मोठी तिची रक्षा करणं हे भावाच आद्यकर्तव्य. देवांचा देव भगवान् श्री कृष्ण देखील या सुंदर नात्याच गोड दर्शन घडवून देतात. जेंव्हा श्री कृष्ण परमात्म्याचे बोट कापते तेंव्हा रुक्मिणी आईसाहेब संपूर्ण घर भर चिंधी शोधण्यास जातात परंतु द्रौपदी मात्र आपल्या भरजरी साडीचा पदर फाडून भगवंताच्या बोटाला बांधतात. भगवंताबद्दल असणारं शुध्द आणि सात्विक प्रेमचं आपल्याला दिसून येतं. पुढे जेंव्हा भर सभेमध्ये द्रौपदीचे वस्तरहरण होत असते तेंव्हा त्या द्रौपदीने बांधलेल्या त्या चिंधीसाठी देव तिच्या पाठीशी उभा राहतो आणि द्रौपदीला वस्त्र पुरवतो. किती विलक्षण अनुभूती म्हणावी याला. रक्षाबंधन म्हणजे काय तर जो सदैव आपली रक्षा करण्यास तत्पर असतो मग ते नातं कोणतही असो. ते नातं बहिण भावाच असो, मैत्रत्वाच असो वा अगदी नवरा बायकोचं असो. त्यातील शुध्द भाव इतकाच की आपण त्याचं मरेपर्यंत रक्षण करायचं.

रक्षाबंधन या सणाला राखी पौर्णिमा असेदेखील म्हणतात. या दिवशी नारळी भात करण्याची पारंपरिक पद्धत आहे. सुग्रास जेवण, सुंदर असे ओल्या नारळाचे गोड पदार्थ प्रत्येक घरामध्ये बनवले जातात. पण हे पदार्थ गोडच का असतात याचा जर विचार केला तर आपल्याला श्रावण महिन्याचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करावा लागेल. श्रावण महिन्यात शक्यतो मांसाहार वर्ज्य करावा अशी मान्यता आहे. कारण बऱ्याच प्राणी आणि पक्षांचा प्रजनन काळ तसेच रोगराई जंतूंचा प्रसार होण्यासाठी हा महिना असतो असं म्हणलं जात. एकूणच काय तर शुध्द शाकाहारी आणि गोड पदार्थ बनवून आपले सर्व सण साजरे केले जातात. 

आपल्या हिंदू संस्कृतीची खरी ओळख ही आपल्या सणांमुळे दिसून येते. कोणताही सण असो त्यामागचा एक मुख्य हेतू म्हणजे सर्वांनी एकत्र येणे हाच असतो. आजकालच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एकत्र येऊन सण साजरे करण्याची पद्धत थोडी मागेच पडली असे मला वाटते. राखीपौर्णिमेच्या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि त्याच्याकडून ओवाळणी घेते. जगातील एक सुंदर नातं म्हणजे बहिण भावाच असतं. जिथे नफा तोटा नसतो. केवळ आयुष्यभर आपल्या भावाच असच प्रेम मिळावं हाच एक सोज्वळ भाव प्रत्येक बहिणीच्या मनात असतो. आजकालच्या युगात आपण पाहतो की, प्रत्येक घरात बहिण भावाची भांडणं झालेली दिसून येतात. पणं त्या भांडणामध्ये अपार प्रेम असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रत्येक गोष्टींवरून अगदी एक एक मिनिटाला भांडणारे बहिण भाऊ राखी पौर्णिमेच्या दिवशी एकमेकांवर प्रेमाची जणू काही बरसात करतात. कितीही भांडले तरी ते एकच आहेत हे जगाला दाखवून देतात. राखीचा धागा केवळ धागा नसून ते एक वचन असतं जे भावाने बहिणीला मनापासून दिलेलं असतं. आणि त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी भाऊ मरेपर्यंत प्रयत्न करत असतो. आपल्या बहिणीच्या डोळयात एक आसव जरी दिसला तरी त्याचा जीव कासावीस होत असतो. कितीही वाईट परिस्थिती असली तरी आपल्या बहिणीच्या सुखासाठी एक भाऊ आपलं सर्वस्व त्याग करायला देखील मागे हटत नाही आणि म्हणूनच या सणाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

सदैव तत्पर समाज हा
करण्यास माझे भक्षण,
भाऊ उभा पाठीशी
करतो बहिणीचे रक्षण...१

राखीपौर्णिमा सण आपला
बहिण भावाच अतूट नातं,
अफाट माया प्रेम अलौकिक 
कृष्ण द्रौपदी प्रेमाचं गान गात...२

करण्यास रक्षण बहिणीचे
भाऊ उभा पाठीशी,
लाखात एक भाऊ असे
बहु पुण्य गाठीशी...३

जगी ना कोठे मिळे 
वेड्या बहिणीची माया,
नित्य राहो भावावर देवा
तुझ्या कृपेची गोड छाया...४

भाऊ बहिणीच नात असतं 
जणू काही प्रेमाचं भांडार,
वर्णन करण्यास अपुरी पडते
माझ्या लेखणीची धार...५

Priti Sraj Bhalerao

सौ. प्रिती सुरज भालेराव, पुणे.