आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा करतात. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधून भावास च्या सुख आणि दीर्घायुष्याची कामना करते.
भावाच्या मस्तकावर लावलेला कुंकवाचा टिळा मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार वं सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. राखीचा धागा फक्त दोरा नसून ते एक शील, स्नेह आणि पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणार्या पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे.
एकमेकांना जोडणारा असा हा रक्षाबंधनाचा सण इतर कोणत्याच धर्म व संस्कृतीत साजरा केला जात नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी, अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे असतात. रक्ताच्या नात्यात व्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते. असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा संदेश आहे.
राखीचा सण म्हणजेच बहीण भावा मधील प्रेमाचा, जिव्हाळ्याचा सण होय. बालपणी चिंचा ,बोरं वरून भांडण करणारी, एवढच नाही तर आईच्या शेजारी कोण झोपणार या कारणावरुन भांडणारी बहिण-भाऊ जसजशी मोठी होत जातात, तसतशी त्यांच्या मधील भांडणे संपून एक प्रेमाच, मैत्रीच नाते तयार होत. आणि बहीणीच्या लग्नानंतर तर बहीण भाऊ खूपच हळवे होतात. आपली लाडकी बहीण परक्या घरी आपल्याला सोडून जाते. तेव्हा मात्र भाऊ पोरका होतो. सतत ताई ला आपल्या घराकडे आणण्यासाठी कारण शोधत असतो त्यातीलच एक कारण म्हणजेच रक्षाबंधन होय.
नागपंचमी नंतर म्हणजेच झोका पंचमी नंतर आठवडाभरातच आगमन होते. तो सण म्हणजे रक्षाबंधन खरं तर श्रावण महिना हा हिंदू संस्कृतीतील एक सणांची पर्वणी देणारा महिना मानावा लागेल. श्रावणात नागपंचमी, राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन आणि शेवटी बैल पोळा व येणाऱ्या गणपती उत्सवाची तयारी. असा संणानी दुथडी भरून वाहनारा महीना म्हणजे म्हणजे श्रावण .
रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा. आपल्या कोळी बांधवांचा समुद्र राजाला सोन्याचा नारळ वाहण्याचा सण. आपल्या देशातील समुद्रकिनारी राहणारी व मासेमारीचा व्यवसाय करणारी सर्व भगिनी व बांधव या रक्षाबंधन म्हणजेच नारळीपौर्णिमेला समुद्र राजा ची पूजा करतात. त्याच्याकडे मासेमारी करताना आमचे रक्षण कर अशी प्रार्थना करतात. आणि सोन्याचा नारळ समुद्र राजाला अर्पण करतात.
आपण सर्वजण मात्र रक्षाबंधन बहिण भावाच्या नात्यातील गोडवा वाढविण्यासाठी साजरा करतो.आपला पारिवारिक आनंद द्विगुणित करण्यासाठी.
रक्षाबंधन दिवशी बहिण भावाच्या मनगटावर एक रेशमी धागा बांधून त्याच्याकडून जीवनभर रक्षणाची प्रेमाची आणि आसूसलेल्या माहेरपणाची हमी घेते. तर भाऊ बहिणीला तिच्या रक्षणाची हमी तर देतोच देतो पण प्रेमाची भेटही देतो.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्व बहिणी माहेराला येतात. आणि ज्यांना येणे शक्य नाही त्या आपल्या भावाच्या येण्याच्या वाटेला डोळे लावून बसतात. आणि मनोमन गीत गुणगुणतात......
गाडी घुंगराची बाई
माझ्या माहेराची,
माझ्या माहेराची
बाई वाट डोंगराची........
वाट डोंगराची,
बाई माझ्या माहेराची......
========================
रक्षाबंधन
सण नाही फक्त राखीचा,
भेट मिळेल या बाकीचा.
रक्षाबंधन......
सण आहे प्रेमाचा,
आपुलकी आणि जिव्हाळ्याचा, हरवलेल्या भावाचा,
सापडत नसलेल्या नावाचा.
रक्षाबंधन........
सण जुन्या आठवांचा,
मनात साठलेल्या साठवांचा,
सासरी भावाला पाहून,
डोळ्यात दाटलेल्या आसवांचा.
रक्षाबंधन........
सण आई-बाबांच्या स्मृतीचा,
त्यांच्या मागं भावाच्या कृतींचा,
राखीला तरी येरे असं,
विणणाऱ्या बहिणीचा.
रक्षाबंधन........
सावरू पाहणाऱ्या पण,
विस्कटलेल्या नात्यांचा
आई-बाबा नंतर जपलेल्या
एकमेव प्रेमाच्या धाग्याचा.
श्रीमती. जयश्री उत्तरेश्वर औताडे,
जि.प.केंद्र. प्रा. शाळा, गंगाखेड,
ता. गंगाखेड, जि. परभणी