मुख्यतः होळी हा रंगाचा सण आहे. हा सण वसंत ऋतु मध्ये मराठी वर्षाच्या अखेरीस फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी सण साजरा केला जातो. हिंदू धर्मातील महत्वाचा सण म्हणून होळी सणाला ओळखतात. सत्याचा असत्यावर विजय, चांगलेपणाचा वाईटावर विजय हे या सणाचे प्रतीक आहे. होळी हा सण दोन दिवस साजरा करतात. या सणाच्या दिवशी लोक द्वेष, वादविवाद, राग विसरून होलिका दहनासाठी एकत्र येतात. होळी साठी लागणारी लाकडे गावातील सर्व लोक मिळून जमा करतात व सर्व स्त्रिया एकत्र येऊन नैवेद्य, पूजेची सर्व तयारी करतात. यावरून असे वाटते की, होळी हा सण नसून समाजाला एकत्र करणारा एक महत्त्वाचा घटक आहे.
गोवऱ्या लाकडे एकत्र करून विशिष्ट प्रकारची मांडणी करतात मग त्या होळीच्या कळेने रांगोळी काढून मुख्यतः संध्याकाळच्या वेळी होळी दहनाची तयारी केली जाते. स्त्रीया होळीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य करतात. होळीची पूजा, आरती करून होळीची प्रदक्षिणा केली जाते. लहान मुले होळी भोवती प्रदक्षिणा घालतात." होळी रे होळी पुरणाची पोळी असे ओरडतात."
भारतात अगदी उत्साहाने आणि आनंदाने जातिभेद,धर्मभेद न करता गुण्यागोविंदाने होळी हा सण साजरा केला जातो. या सणाला हिंदीमध्ये होलिका दहन असेही म्हणतात. त्याचबरोबर या सणाला ग्रामीण भागात शिमगा असेही देखील म्हटले जाते. शहरी भागात होळीला रंगाची उधळण संगीत आणि नृत्य या सारखे वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. भारतात मुख्यतः हा सण शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात साजरा करतात. होळी हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जाणारा सण आहे .आणि मुळात हा सण वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळी साजरा केला जाणारा एक कृषी महोत्सव ओळखला जात होता. प्रत्येक सणाची कहाणी आहे. तसेच होळी साजरी करण्यामागे एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता. तो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवाचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील त्याला पसंत नव्हते. परंतु त्याचा मुलगा हा भगवान विष्णूचा परमभक्त होता. आणि हे हिरण्यकशपूला अजिबात मान्य नव्हते. परंतु वेगवेगळ्या प्रकारे भक्त प्रल्हादाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असायचा. जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे बंद करेल.पण भक्त प्रल्हाद न घाबरता तो भगवान विष्णूची भक्तीत लीन असायचा.
सगळे उपाय केल्यावर राजा त्रासला आणि एक योजना आखली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते. की,ती अग्नीवर विजय प्राप्त करू शकते.तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला. व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला. आणि थोड्या वेळातच होलिका जळायला लागली. लगेच एक आकाशवाणी झाली आणि त्यानुसार होलिकेला आठवलं की, तिला वरदान देताना असे सांगितले होते की, तिच्या वरदानाचा दुरूपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून खाक होईल. भक्त प्रल्हादाला अग्नी काहीच करू शकली नाही. मात्र होलिका त्या अग्नीत जाळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होलिकादहन म्हणून ओळखले लागले.
दुसऱ्या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्स्व साजरा करतात.
सौ.ज्योत्स्ना भास्कर बन्सोड
कुरखेडा जि.गडचिरोली