एक वैवाहिक जीवनाचे समुपदेशन करणाऱ्या समुपदेशकाला नवरा आणि बायको यांच्यातील काही प्रश्नांबाबत आणि ते सोडवण्यासाठी आवश्यक अशा मार्गांबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. त्याने सांगितले ते असे, काही वेळा माझ्याकडे एखादा नवरा आणि बायको आपल्या जीवनसाथीबद्दल अगदी कटू अशा तक्रारी घेऊन येतात. तेव्हा मी त्यांना एकमेकांच्या बाबत कोणत्या विषयांवर तक्रार आहे. ते लिहायला सांगतो तसेच कोणते गुण स्तुती करण्याजोगे आहेत किंवा अजुनही स्तुती करता येऊ शकतात तेही लिहायला सांगतो पण गंमत सांगायची म्हणजे, एखाद्याही गोष्टीबद्दल स्तुती करण्यास असमर्थ आहे, असा एकही तक्रारदार मला तरी अद्यापपर्यंत सापडला नाही. बऱ्याचदा ही साधीशी गोष्टही त्यांच्या संपूर्ण नातेसंबंधाला एक वेगळे वळण देऊन जाणारी ठरते. एका माणसाला मी हेच पुढेही जरा करण्यास सांगितले.
त्या दिवशी सायंकाळी तो त्याच्या बायकोजवळ कागद आणि पेन्सिल घेऊन लिहायला बसला होता, तिच्याकडे तो सारखं सारखं वळून पाहायचा आणि मग लिहायचा. तुम्ही काय करीत आहात? तिने अखेरीस विचारले. तुझ्यात कोणकोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, त्यांची यादी करीत आहे. चांगल्या गोष्टी..? तिने साशंकपणे विचारले, माझ्याजवळ काही चांगल्या गोष्टी आहेत, असं तुम्हाला वाटत असेल, असं मला वाटत नाही. ठिक आहे, तुला वाटतं तर वाटू दे..." तो म्हणाला आणि आपलं लिहिणं चालूच ठेवलं. त्याने आपल्याविषयी काय काय लिहिलंय, हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने ती उठली आणि त्याला काय लिहिलंय, ते दाखवा', असं म्हणाली. आधी तो नाही म्हणाला पण मागाहून राजी झाला.
त्याने जे काही लिहिलं ते तिने अतिशय आश्चर्याने आणि आनंदाने वाचलं. "का?" कारण ती असं म्हणाली, "माझ्यातील कुठल्या गोष्टीचा तुम्हाला आनंद होत असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. अनेक गोष्टींचा होतो, थोड्या काही गोष्टीचा नाही तो आनंदाने म्हणाला.
"छान" ती म्हणाली, "जर असं असेल तर त्याचीही एक यादी करा. " ती म्हणाली. "करेन..." तो म्हणाला "पण तूही माझ्यासाठी तशीच यादी करणार असशील तर त्यामुळे झाले काय की त्यांच्या एकमेकांविषयी ज्या काही तक्रारी होत्या, ते त्या एकमेकांसमोर शांतपणे आणि सलोख्याने मांडू शकले. त्यामुळे त्यातील काही गोष्टीविषयीचा तिढा ते सहजपणे सोडवू शकले.
वैवाहिक जीवनामध्ये जे प्रश्न निर्माण होतात, ते नेहमीच संवादाच्या अभावामुळे निर्माण होतात. जेव्हा जीवनसाथी अगदी प्रामाणिकपणे आपापल्या भावना एकमेकांसमोर मांडतात, तेव्हा सारे प्रश्न सहज सुटतात.