चांगल्या वृद्धत्वासाठी तयारी करा

कुठलेही नवे काम करण्यासाठी वय हे काही अडथळा नसते

चांगल्या वृद्धत्वासाठी तयारी करा

एक स्विस पत्रकार, ज्याने आयुष्यभर भरपूर परिश्रम केले होते आणि चांगलं काम केल्यामुळे भरपूर प्रसिद्धी आणि पैसाही मिळवला होता, त्याने निवृत्ती स्वीकारण्याचे ठरवले. त्याचं शेवटचं काम इटलीचे नवनिर्वाचित पंतप्रधान अल्सिड दे गॅस्परी यांची मुलाखत घेण्याचं होतं. जेव्हा मुलाखत घेण्याचे काम संपलं आणि दोघेही चहा घेण्यासाठी जरा निवांत बसले, सहज बोलता बोलता पत्रकार म्हणाले, "ही माझी शेवटची मुलाखत आहे, मी आता पासष्ट वर्षांचा झालोय आणि आता निवृत्ती घेतोय,"

तेव्हा नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणाले, "ओह! दुर्दैव. मी पण पासष्ट् वर्षाचाच आहे, पण नव्या जबाबदारीच्या उंबरठ्यावर उभा आहे."

कुठलेही नवे काम करण्यासाठी वय हे काही अडथळा नसते. इतिहासामध्ये अशी खूप उदाहरणे आहेत की लोकांनी वयाच्या बऱ्याच उशीरा आपले काम सुरू केले आणि लवकरच बरेच काही प्राप्त केले. श्रील प्रभुपाद, जे 'आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघा'चे संस्थापक आहेत, हे त्यापैकीच एक उदाहरण आहे. वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी ते भारतातून अमेरिकेमध्ये गेले. भारत सोडण्यापूर्वी, त्यांनी तीन पुस्तके लिहिलेली होती. पुढच्या बारा वर्षांमध्ये, त्यांनी जवळपास साठपेक्षा जास्त पुस्तके लिहिली. भारत सोडण्यापूर्वी, त्यांनी फक्त एका शिष्यावर अनुग्रह केला होता, पण पुढच्या बारा वर्षांमध्ये जवळपास चार हजार शिष्य झाले. अमेरिकेला जाण्यापूर्वी ते कधी परदेशातही गेले नव्हते. पण पुढच्या बारा वर्षामध्ये, कृष्णभावनामृत संघाचा प्रसार करण्यासाठी ते अनेकवार जगभर फिरले.

 त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीच्या अगदी शेवटच्या क्रान्तीकारी टप्प्यावर जरी त्यांचं असं कार्य झालेलं असलं तरीही ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे कमावलं, त्याची तयारी म्हणजे त्यांच्या आयुष्यातील एकोणसत्तर वर्षे होती.