आपण पुढे आहोत

वाईट मार्गाने श्रीमंत होणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांच्या मागे असण्यापेक्षा समाजात सन्मानाने जगणाऱ्या सामान्य माणसांमध्ये पुढे राहण्याची प्रेरणा देणारा पुनम सुलाने लिखित सुंदर लेख

आपण पुढे आहोत

प्रवास जीवनाचा असो अथवा यशाचा जेव्हा आपण पुढे पाहतो तेव्हा आपल्याला असे वाटते की, लोक आपल्यापेक्षाही खूप पुढे गेली आहेत आपण किती मागे आहोत ना...!
पण,, तेव्हाच जर आपण थोडेसे मागे वळून बघितले तर वयाने आणि परिस्थितीने देखील आपल्यापेक्षा छोटी असलेली अनेक लोक आपल्या मागे आपल्याला दिसतील.आपल्या जीवन प्रवासात आपण नेहमी एका निश्चित ध्येयासाठी धावपळ करत असताना एखाद्या वळणावर निवांत उभे राहून ज्या ठिकाणाहून आपण आले आहोत त्याकडे वळून पाहता आले पाहिजे.

जे नाही मिळाले त्यासाठी आपली धावपळ आतापर्यंत थांबलेली नाही कदाचित पुढे ही कधी थांबणार नाही मग ते ध्येय कोणतेही असो. मात्र, या सर्वात जे आपल्याला प्राप्त झाले आहे त्याचा उपयोग आपण किती प्रमाणात स्वतःसाठी आणि इतरांसाठी केला याचा हिशोब थोड्यावेळासाठी का असेना आपल्याला करता यायला हवा. मी आणि माझा कुटुंब माझे नातेवाईक याव्यतिरिक्त समाजाला देण्यासाठी आपल्याकडे खरंच काही आहे का याचा विचार आपल्याला करता यायला हवा. भ्रष्टाचार करून पैसे कमावणारे जरी आज श्रीमंत दिसत असली तरी जग सोडून जाताना आपल्या सोबत काहीच घेऊन जाणार नाही हे सर्वांना माहीत असून सुद्धा त्यांचे अनुकरण करणारे देखील आज समाजात कमी नाही.

वाईट मार्गाने पैसा कमवून समाजात स्वतःची शान मिरवणाऱ्या मागे जाण्यापेक्षा दोन वेळच्या जेवणासाठी  दिवस-रात्र कष्ट करून स्वकष्टाने कुटुंब चालवणाऱ्या मेहनती लोकांकरिता तुम्ही मनापासून काही करू शकत असाल, तर लक्षात ठेवा तुम्हाला आपण समाजाचे देणे लागतो आणि त्यासाठी आपण काही करू शकलो याचे  समाधान नक्की लाभेल आणि त्यातून एक भावना तुमच्या मनात नक्कीच येईल आणि ती म्हणजे वाईट मार्गाने श्रीमंत होणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांच्या आपण मागे नाही तर समाजात सन्मानाने जगणाऱ्या सामान्य माणसांमध्ये आपण पुढे आहोत....

Poonam Sulane

पुनम सुलाने