जर तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी तुमच्याकडे आज वेळ नसेल तर, येणाऱ्या दहा वर्षानंतरही तुमच्याकडे स्वतःसाठी वेळ नसणार.
अनेक वेळा आपल्या जीवनात आपण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करावं अशी आपल्यापैकी अनेकांची इच्छा असते मात्र, जेव्हा प्रत्यक्ष काहीतरी करायची वेळ येते तेव्हा आपल्यापैकी अनेक जणांकडे 'खूप काही करावं वाटतं मात्र स्वतःसाठी वेळच नाही' अशी तक्रार करणाऱ्यांची संख्या जास्त असते.
नेहमी वेळ नाही याची तक्रार केल्यापेक्षा जर आपण त्या लोकांबद्दल विचार केला तर कदाचित आपली तक्रार नक्कीच दूर होऊ शकते जे लोक आपल्या जीवनात यशस्वी झालेले असतात. त्यांनादेखील दिवसाचे चोवीस तासच मिळतात. मात्र त्यांचे यश हे एका दिवसात मिळालेले नसून अनेक वर्षापर्यंत त्यांना मिळालेल्या चोवीस तासाचा त्यांनी केलेल्या सदुपयोग याचा तो परिणाम असतो.
जीवनावश्यक गोष्टीसाठी आपल्याला वेळ हा द्यावाच लागतो. आपण कितीही व्यस्त असलो तरी, हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण त्यासाठी वेळ काढतो देखील मात्र आपल्या छंदासाठी विशेष वेळ देणे हे आपल्याला इतके आवश्यक वाटत नाही.
जीवनात कोणताही एखादा छंद असणे आणि तो जोपासणे म्हणजेच जीवनाला आनंदी आणि सहज बनवण्यासाठी आपण स्वतःला स्वतःसाठी दिलेला महत्वपूर्ण वेळ आहे. हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही, तोपर्यंत आपल्या छंदासाठी आपल्याला वेळ देता येणार नाही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.
कोणतीही गोष्ट मनापासून करायची ठरवली तर त्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. उलट ती गोष्ट केल्याशिवाय आपला वेळच जात नाही. याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या सर्वांना आपले छंद जोपासताना नक्कीच येईल. आपल्याजवळ असलेल्या रिकाम्या वेळेचा उपयोग आपण खरंच जर आपला छंद जोपासण्यासाठी केला तर त्याचा उपयोग स्वतःला आनंदी राहण्यासाठी तर होतोच मात्र आपण जोपासलेल्या छंदाचा उपयोग आपल्याभोवती असलेल्या अनेकांना मार्गदर्शक देखील ठरतो. जेव्हा आपले छंद इतरांसाठी मार्गदर्शन ठरते तेव्हा ते छंद आपली ओळख होऊन जाते.
कुठेही न जाता स्वतःची एक वेगळी ओळख आपल्या छंदातून आपल्याला निर्माण करता येते आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण होणे म्हणजे यापेक्षा जास्त आनंद काय आहे. आपल्या छंदात आनंद दडलेला अशा या छंदासाठी नक्कीच दिवसातून एक तास का असेना वेळ देता यायलाच हवा ना!
यावर नक्कीच विचार कराल !
पुनम सुलाने, हैदराबाद