काळानुसार सर्वच परिस्थिती बदलत चालली आहे. आमचे अंगणात खेळण्याचे बालपण आताच्या मुलांचे मोबाईल मध्ये बालपण जात आहे. मुलानांही काही म्हणता येणार नाही कारण आधीची आई जरा वेगळी होती बाळ पोटात असल्यापासूनच वाचन सुरू करायची अर्थात बाळ पोटात असल्यापासूनच ती संस्काराला सुरुवात करत असे. पण आताचा काळ बदललाय आताची आई मोबाईल वर खूप व्यस्त झाली. तसेच टिव्ही मध्ये दंग असते त्यामुळे मुलं देखील वाचनाकडे कसे वळणार बरे!
आम्ही भावंड लहान होतो तेव्हा रात्री झोपतांना आजीच्या गोष्टी ऐकतांना आम्ही चंद्राची सवारी करून यायचो गोष्टी ऐकत-ऐकत कसे डोळे मिटायचे कळतही नव्हते. मैदानावर किती वेळ खेळताय म्हणून आम्हा भावंडांना तर मार ही पडत असे लपंडाव, खो - खो, सुरपारंब्या ह्या सारखे खेळ आमचे रंगत असत किती खेळताय असा आईचा नेहमी ओरडा खावा लागत असे बालपण कसं रम्य होतं आमचं! आता तर खेळाचे नावे देखील अनेकांना माहीत नाही असे दिसते आहे. कुठंतरी मोबाईलच्या बाहेरचे जग हरवत चालले, विसर पडतं चाललेले चित्र दिसतं आहे.
आजची लहान मुलं थोडाही मोबाईल सोडत नाही. कारण आईचेच संस्कार बदललेत आई ऑनलाईन असल्यामुळं मुलाची आणि मैदानातील खेळामध्ये पोकळी निर्माण झाली. त्यांना सांगणारे कोणी राहिले नाही त्यांच्या हातात मोबाईल देऊन शांत एका जागेवर बसवले जाते. लहान मुलं जे ते बघता तेच आचरणात आणत असतात. आजीच्या गोष्टीची तर आवडच आजच्या लहान मुलांमध्ये राहिलेली नाही.
"बालपण" मोबाईलमध्ये कोंडत चाललंय, खरंच रम्य बालपण हरवत चालले आहे. आणि तरुण पिढीवर बोलायला तर वावच नाही. जो तो आपल्या फोन मध्ये अगदी व्यस्त आहे. मोबाईल म्हणजे व्यसनच झालंय. कोणालाच शेजारी असलेल्या व्यक्तीबरोबर बोलायला देखील वेळ नाही. आम्ही लहान होतो तेव्हाचा काळ खूप वेगळा होता. गावातल्या झाडाखाली तरुण तसेच थोर मंडळी गप्पा मारताना दिसायचे. आम्ही समोरून जातांना सहज ते खुशाली विचारत बोलायचे आणि आज दुसरीकडचं चित्र फार वेगळं आहे तरुणपिढीला सावडच नाही. मोबाईल च्या बाहेरचं जग बघायला.
हजारो मित्रांचा परिवार अगदी खिशात असतो. समोरासमोर संवाद संपत चाललाय, वाचनाला तर वाचाच फुटत नाही. सगळं ऑनलाईन झालंय ना. मोबाईलचा अतिवापर खुप काही हिरावून घेतोय.
एकेकाळी घट्ट गळा पकडून रडणारी माणसं फक्त व्हाट्सऍप वर इमोजी पाठवून रडणं व्यक्त करतात मोबाईल मुळं भावनाही कोमेजत चाललेल्या दिसतात. येवडच काय बंद कपाटात पुस्तकांनी आत्महत्या केली आणि आत्महत्येच्या पत्रावर आरोपीच नावं मोबाईल लिहलेलं मिळालं.
खरंच प्रत्येकाने मोबाईल वापरावा ती काळाची गरज आहे पण त्याचबरोबर पुस्तक देखील वाचावे आपल्यालाच आपल्या चुका लक्षात यायला लागतात.
स्नेहल लक्ष्मण जगताप,
मु. पो. सिरसगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद