ओंजळ कधीही रिकामी राहत नाही

पहिला मार्ग चुकीच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांचा मार्ग, जरा सुसह्य वाटतो,तिथे एक नवा मार्ग असतोच , योग्य दिशेने प्रयत्न करण्याचा..

ओंजळ कधीही रिकामी राहत  नाही

'सारं काही वेळेवर व्हायला हवं', नेहमीचच एक वाक्य थोरा-मोठ्यांच. पण काय असते ही वेळ, तीच गणित आजवर कुणालाच उमगलेलं नाही. सगळ्यांचं सगळंच कसं एकाचवेळी वेळेवर होईल बुआ.. नाहीच शक्य, अहो, थोडी नजर टाका, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत.. सगळ्यांच्या वेळा वेगवेगळ्या, मग का करावा अट्टाहास, तो यशस्वी झाला, मग मी का नाही?, तिचं लग्न ठरलं, माझं का नाही? नुकतंच तर झालं सहा महिन्यांपूर्वी लग्न शेजारच्या माधवीच आणि आता लगेच 'गुड न्यूज'.. इथे पाच वर्ष झालीत, तरी अजून हॉस्पिटलच्या वाऱ्या करत आहोत,  अमक्या अमक्याच आयुष्य किती सहज साधं सरळ आहे, सगळंच कसं सहज घडतं अगदी वेळेवर, मग माझं आयुष्य का नाही असं साधं सरळ? असे प्रश्न नेहमीचं पडतात ना.. 
   
पडतात प्रश्न पडू देत, प्रश्नच शेवटी ते..पण कधी केलाय प्रयत्न उत्तरं शोधण्याचा.. 'हम्म, केला खूप केला'. असंच उत्तर मिळेल. कारण प्रयत्नात कसूर केलेली नसतेच. पण 'इच्छित फळ' मिळालेलं नसतं. का होत असेल असं?.. कधी कधी प्रयत्नांची दिशा चुकलेली असते, तर कधी 'वेळच असते प्रतिक्षा करण्याची'.. 
    
पहिला मार्ग चुकीच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांचा मार्ग, जरा सुसह्य वाटतो,तिथे एक नवा मार्ग असतोच , योग्य दिशेने प्रयत्न करण्याचा.. पण दुसरा मार्ग, मात्र 'प्रतिक्षेचा.. प्रयत्न योग्य दिशेने झालेले असतात, पण.. या पण वर येऊन सगळंच शांत झालेलं असत. पुढे कसं जायचं काहीच माहीत नसतं.. रोज वाट पाहून जीव कंटाळून जातो, त्यात एखादी खोचक शेजारीण विचारून जातेच, 'काय ग मिळतील ना लाडू यावर्षी'? किंवा एखाद्या मित्राला लागते , मोठ्या पगाराची नोकरी नी स्वतः च मन स्वतः लाच विचारू लागतं, 'मेरा नंबर कब आयेगा? उगाच मग नशिबाला दोष दिले जातात, नेमकं कारण सापडतच नाही. खूप राग येऊ लागतो स्वतःचा. कोणीतरी वयस्कर व्यक्ती समजावून जाते, 'अजून वेळ आली नाही तुझी, धीर धर.. सब्र का फल मिठा होता है, वैगेरे वैगेरे. त्या समजावणीला मनाने उत्तर दिलेलं असत, "सब्र का फल मीठा होता है, लेकिन फल खाने के लिये दांत तो बचने चाहिये."
    
नकोच काही आता, अशा अवस्थेपर्यंत येऊन पोहोचलेलं मन, आणि काय हे वेळेचे पुराण असं म्हणणारा मेंदू. दोघेही शांत होतात. एकदम शून्यत्वात (neutral)  पोहचतात. सकरात्मकता ही नाही आणि नकरात्मकता ही नाही. आयुष्याच्या आघाडीवर ही तसे शून्यत्वच असते, सरकत जातो काळ , त्याच्या त्याच्या वेगाने. कधी थांबलाय तो कुणासाठी? 

एके दिवशी येतो, सकाळी सकाळी फोन, ''मॅट्रिमोनिअल साईट वर 'प्रोफाइल पाहिली तुमच्या मुलीची, पसंत आहे मुलगी, कधी येऊ लग्न ठरवायला?"  काय उत्तर द्यायचं कळत नसतं कारण आठ दिवसांपूर्वीच जुन्या मित्राने विचारलेलं असतं लग्नासाठी, होकार ही दिलेला असतो आणि मॅट्रिमोनिअल साईट वरचा प्रोफाइल डिलीट करणं राहून गेलेलं असत.
    
संध्याकाळी घरी आल्या आल्या आई सांगते, "अरे, तुझं अपॉइंटमेंट लेटर आलंय, बघ जरा!" लिफाफा फाडून पत्र वाचायला सुरुवात होते, उगाच हसायला येतं, वर्षभरापूर्वी दिलेल्या सरकारी नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीच्या प्रित्यर्थ ते अपॉइंटमेंट लेटर असत, पण पुन्हा एक प्रश्न उद्भवतो, मित्रासोबत भागीदारीत काढलेला व्यवसाय नावारूपाला आलाय,छान.. आता का आले बरे हे लेटर? ते लेटर कपाटात जपून ठेवले जाते, नोकरी साठी केलेल्या प्रयत्नांच्या आठवणीत... दत्तक मुलं घेऊन दोन महिने झालेले असतात, आणि नव्या पाहुण्याची चाहूल लागते. बसतो पूर्ण विश्वास, केलेले प्रयत्न वाया जात नाहीत. काय असतं, वेळेचं गणित हे अजूनही उमजत नाही. ती चालत राहते सोबत. कधी कधी हवीहवीशी वाटणारी वस्तू, माणसं काढून घेते, रडवते, दुःखावर फुंकर ही तीच घालते, हरवलेलं परत मिळवूनही देते.. तर कधी हरवलेल्यापेक्षाही 'अप्रतिम' असं ओंजळीत आणून टाकते.. आपण जातो आपल्या मार्गाने, ती 'नवा मार्ग ' शोधून काढते.

Sneha Kolage

स्नेहा कोळगे, मुंबई