वीस ची नोट... रिमाइंडर!

आज मैत्रिणी बरोबर माॅल मधे शॉपिंग आणि त्या नंतर बर्गर पिझ्झा चं डिनर करून संध्याकाळ मस्त घालवयाची असा बेत बनवला

वीस ची नोट...    रिमाइंडर!

आज मैत्रिणी बरोबर माॅल मधे शॉपिंग आणि त्या नंतर बर्गर /पिझ्झा चं डिनर करून संध्याकाळ मस्त घालवयाची असा बेत बनवला.माझी मैत्रीण, लीना ठरल्याप्रमाणे चार वाजता घरासमोर मला पिकअप करायला पोहचली. घराला कुलूप लावून मी तिच्या कारमध्ये जाऊन बसले.गाडी मॉल चा रस्त्यावर धावू लागली.
माझी नजर तिच्या रियर व्ह्यू आरश्या ला लटकवलेल्या कार हँगिंग वर पडली.काही तरी एकदम वेगळं. 20 रुपया ची लेमीनेट केलेली एक नोट!
मी लीना ला उत्सुकतेने विचारलं !" 20 ची नोट? काय गं हे? पाहिली कमाई,लकी चार्म, का कुणी स्पेशल व्यक्ती ने दिलेली आठवण?"
तिने हसून सांगितलं!"अहं,!यापैकी काहीच नाही. हे आहे "रिमाइंडर"!!

" रिमाइंडर? कसले रिमाइंडर"?

ती म्हणाली "यामागे छोटा सा किस्सा आहे. ऐकशील?"
मी सीटमध्ये थोडीशी वाकडी होऊन बसले आणि उत्सुकतेने तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हटलं "हो नक्कीच! काहीतरी गंमतशीर वाटतंय"
ती म्हणाली ,"हो गंमतशीर ही आणि माझ्या चेहऱ्यावर एक चपराकही."

लीना सांगू लागली," मी नुकतीच एका एक्झिबिशन मधे शॉपिंग करायला गेली. कोविड नंतर भरलेलं हे इथलं पहिलंच एक्जीबिशन होतं. मी एका सिरामिक पॉटच्या स्टॉल वर गेली. पाहिलाच दिवस असल्यामुळे स्टॉल अजून पूर्णपणे लागलेला नव्हता. एका बाजूला क्रॅक गेलेले किंवा छोटा सा टवका उडालेले थोडे "डॅमेज्ड" पाॅट्स ठेवलेले होते , तर दुसऱ्या बाजूला व्यवस्थित असलेलं सामान विक्री साठी रचून ठेवलं होतं.
दुकानावर वीस-बावीस वर्षांची दोन मुले होती. मी त्यांना विचारलं हा काय प्रकार आहे म्हणून? त्यांनी त्यांच्या भाषेत माहिती पुरवली की लाॅक डाऊन मुळे अनेक दिवस त्यांचा माल एका ठिकाणी अडकून पडला होता. नंतर जेव्हा त्यांनी तो उचलला तेव्हा सामानाचं बरंच नुकसान झालेलं होतं. त्यांचे वडील स्वतः पॉटरी आर्टिस्ट होते पण covid-19 मुळे ते मरण पावले.ते दोघं ही शिकत होते पण वडील गेल्यानंतर जेंव्हा रोजीचा प्रश्न पडला तेंव्हा दोघांनी हेच काम पुढे न्यायचं ठरवलं.
सगळया वस्तुंवर प्राईस टॅग लागलेले होते. किमती अगदी वाजवी होत्या.मी माझ्या गरजेनुसार चार पॉटस घेतले आणि नर्सरी तून आणलेल्या दोन जेड च्या झाडांसाठी दोन छान सारख्या कुंड्या शोधायला लागली.एक कुंडी खूप आवडली.मी त्यांना त्या सारखी दूसरी शोधायला सांगितली पण अगदी सारखी कुंडी मिळेना."डॅमेज्ड" सामानाच्या ढिगातून त्याला तशीच एक कुंडी मिळाली. त्याचा अगदी छोटा सा एक टावका उडाला होता. तेवढा भाग मागे करून डॅमेज लपवता येणं सहज शक्य होतं म्हणून मी ती विकत घ्यायचं ठरवलं.त्याने "डॅमेज्ड"माल म्हणून आपणहून त्याची किंमत अर्धी केली.मी मनातल्या मनात फार खुश मात्र त्या मुळे माझ्या आतला बार्गैन चा कीडा वळवळला.

मी सगळं मिळून किती पैसे झाले विचारलं.सगळ्या सामानाचे 650 होतील याचा मला अंदाज आलेला आणि मी 550 च देईन हे स्वतः शी ठरवून टाकलं.
त्या तरुणाने बेरीज करून,डिस्काउंट करून 520 रुपये सांगितल्या वर खरं तर मुकाट्याने आणि आनंदाने मी त्याला 520 नको का द्यायला हवे होते पण का माहित नाही मला त्याचा शी घासघिस करायचा जोर आला.
अजिबात कारण नसतांना,मी त्याला म्हणाली ,"नही भैया 500 ठीक है."
तो फार विनवणी ने म्हणाला,मॅडम हमारा धंधा वैसे ही बहुत मंदा चल रहा है, हमारे माल का कितना नुकसान हुआ है आप तो देख ही रही हैं ! ₹ 20 से आपका क्या बिगड़ जाएगा ?"
मी तावातावात म्हटलं ,"वीस रुपये पेड पर लगते है क्या? ऐसा करो 20 रुपये कम नहीं कर सकते तो उसकी जगह एक कोई और सामान दे दो।"
त्याने बराच वेळ मला मनवायचा प्रयत्न केला पण मी अगदी उगाच अडून बसली होती.शेवटी त्यातला शांत बसलेला दूसरा मुलगा मिश्किल पणे पहिल्या ला हळूच म्हणाला,मॅडम को वो "कटोरा" दे दो फ्री में,उनके लिये सही है.
"कटोरा" शब्द ज्या टोन मधे त्याने उच्चारला, तो टोन मला खूप बोचला.मी त्यांना म्हणलं ,"आपका मजाक मेरी समझ में आ गया" आणि तावातावाने 520 रुपये देवून मी त्याचा कडून ते पॅक केलेलं सगळं सामान घेवून कार मधे बसली.माझ्या मना सारखं होऊन देखील आतून आनंद नव्हता उलट "कटोरा" शब्द वापरला याचा राग होता. दोन मिनिटं कार मध्ये तशीच बसून राहिली,काय करावं सुचेना.मग ठरवलं की नकोच हा कटोरा .समजतात काय हे स्वतः ला?
हे परत करते आणि माझे 20 रुपये परत घेते असा दुष्ट विचार मनात येताच,
सामनातून ते छोटं भांड काढलं . बघते तर काय , मला त्यात 20 रुपया ची ही नोट दिसली .
मी हैराण! स्वतः ची लाज वाटली.
ऐसी कार मधून फिरणारी ,महिन्याला 6 आकडी लठ्ठ पगार घेणारी, कोविड मुळे कुठे ही आर्थिक संकट न झेलणारी ,मी या 20 रुपये साठी इतकी बर्गैनिंग का करत होती?
दुसऱ्यांच्या लाचारी मधे स्वस्त खरेदी ची दडलेली संधी शोधणारी, मी स्वतःला सुशिक्षित/ सुसंस्कृत का म्हणून घेते ?
ठरवलं! हे पैसे आपल्या जवळ ना ठेवता एका भिकाऱ्याला द्यायचे, पण दुसऱ्याच क्षणी विचार आला की भीक मागणार्‍याला मी फुकट पैसे द्यायचे आणि मेहनत करणाऱ्याला त्याचा मेहनती चा पैसा देतांना एटिट्युड दाखवायचं?"

"अंजली!कधी कधी आपण उगाच विचित्र वागतो,अगदी कारण नसतांना आणि विचित्र वागतोय हे कळत असलं तरीही थांबत नाही. मग या यूजलेस ईगो पायी मामला लांबत जातो.
गरीब भाजीवाल्यांशी, रोड साईड वेंडर्सशी भाव करतो आणि माॅल मधे जाऊन निरर्थक वस्तु विकत घेऊन येतो.का तर म्हणे ब्रँडेड!!
खरं पाहिलं तर लक्षात येईल की आपण गिऱ्हाईक म्हणून केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेलाच हातभार लावू शकतो असं नाही तर आपले सामाजिक ऋण देखील फेडू शकतो!"
मी मधेच विचारलं,"ते कसं?"
" अगं!काय घेतोय आणि कुणा कडून घेतोय हे विचार पूर्वक ठरवायचं बस!!
राष्ट्रप्रेमा पायी दरवेळेस सगळ्यांना बॉर्डर वर लढणे शक्य नाही किंवा फक्त रुल अबायडिंग सिटिझन होणेच पुरेसं नाही, शॉपिंग सारख्या छोट्या गोष्टीतून देखील मी माझ्या देशवासीयांवर प्रेम करू शकते , सह-संवेदनशील राहू शकते याचा साक्षात्कार मला "कटोर्‍यातल्या" ह्या वीस रुपयांनी करवून दिला. मी किंवा माझ्या घरचे, जे कुणी ही गाडी घेवून जातात, ही लटकती नोट त्यांना रिमाईंडर देते. कोणत्या वस्तू घरी आणाव्या आणि कुणाकडून विकत घ्याव्यात या दोन सोप्या फॉर्म्युलाने आम्ही लोक आपल्यापरीने सामाजिक दायित्व निभावत आहोत."

लीनाची गोष्ट ऐकून मी थक्क झाले! साध्या आणि दैनंदिन जीवनातल्या कृतीतून देशप्रेमाची ही संकल्पना मला मनापासून पटली. मनातल्या मनात ,मी वापरत असलेल्या ब्रँडेड आणि विदेशी वस्तूंचे देशी विकल्प काय, याचा विचार करु लागले.

स्टिअरिंग व्हीलवर असलेल्या लीनाच्या हातावर हाथ ठेवून तिला म्हणलं ," ए!! कार वळव, आपण क्राफ्ट बाझारला जाऊ आणि मग छान सिजनल सरसोंका साग- मक्के दी रोटी वर ताव मारून परत येवू... आणि हो तुझा तो "कटोरा" मला दे रिमांईडर म्हणून! क्या बोलती?"
तिने जोरात होकारार्थी मान हलवली आणि
आम्ही दोघी समाधानी आनंदाने हसलो.

(सत्य घटनेवर आधारित)

डॉक्टर आरती केळकर