गुडीपाडवा मराठी वर्षाच्या पहिला दिवस ...

चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना. याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरवात होते. त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदीत होते, हिरव्या रंगबिरंगी छटा झाडा फुलांवर खुलून दिसतात

गुडीपाडवा  मराठी वर्षाच्या पहिला दिवस ...

गुढीपाडवा हा वर्षातील चार मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. घरोघरी गुढी उभारताना वेळूची काठी धुवून त्यास हळद-कुंकू लावून दारात पाटावर उभी केली जाते. त्याच्यावर तांबा, पितळ चांदीच्या तांब्यासह कडूलिंब, रेशमी नवीन वस्त्र, साखरेची गाठी, चाफ्याच्या फुलांची माळ, कापसाचे वस्त्र इ.सह गुढी उभारली जाते. दारात सुंदर रांगोळी व दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. त्या दिवशी सर्व जण नवीन कपडे परिधान करून मंदिरात जातात. गुढीला पुरणाचा व इतर पक्वांनाचा नैवेद्य दाखवला जातो.

चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना. याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरवात होते. त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदीत होते, हिरव्या रंगबिरंगी छटा झाडा फुलांवर खुलून दिसतात, वसंत ऋतु आपले सारे वैभव अगदी मुक्तहस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मग आपण नव्या वर्षाचे स्वागत नको का करायला ?

चैत्रचा अर्थ, नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा. या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो व हीच चैत्र शुध्द प्रतिपदा होय, पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपणास माहीत आहे का? या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडले आहे. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते, तो चैत्रमहिना, चैत्र हा शब्द 'चित्र' या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे.

चित्र म्हणचे विविध वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते. अशा या नयनरम्य चैत्र महिन्याचा पहिला दिवस वर्ष प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा 'गुढीपाडवा' आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा चार मुहुर्तापैकी एक मानला जातो.

गुढीपाडवा हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे, 'गुढी' म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजयध्वज , याच दिवशी ब्रम्हदेवाने जग उत्पन्न केले, सृष्टी निर्माण केली, प्रभु रामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून, रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला. त्यावेळी लोकांनी गुढ्या -तोरणे उभारून दिवस आनंदाने साजरा केला तो हाच दिवस गुढीपाडवा.

पुराणांमध्ये दिलेली ६० संवत्सरे आहेत. त्यापैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो. शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला त्यामुळे हा दिन विजयदिन म्हणुन ओळखला जातो. शालीवाहन राजाच्या विजयदिनापासून नवीन कालगणना सुरू झाली. त्याला 'शालीवाहनशक' म्हणतात, गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजयध्यज आहे.

प्राचीन काळी चेदी देशात वसु नावाचा राजा राज्य करीत होता. धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असतांना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली. राजाने त्या काठीला श्रृंगारून, भक्तिभावाने तिची पूजा करून, ती आपल्या राजभावना समोर उभी केली. तेव्हापासुन गुढी उभारण्याची प्रथा सुरू आहे.

गुढी आपल्याला काय सांगते ?

मुलांनो नवीन वर्ष सुरू झालयं, नवीन विचार करा, संकल्प करा, सदविचार सदाचार यांची झेप, आकाशाला गवसणी घालू द्या. मी जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या, सेवेत सातत्य असू द्या."

गुडीपाडवा बदल कथा

प्रभु रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांनी १४ वर्ष वनवासात काढली, यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवित होता. तो श्रीरामचंद्राच्या येण्याचीच वाट पहात होता. १४ वर्षे पूर्ण झाली. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभु रामचंद्र आले नाहीत तर आपण स्वत:ला जाळुन घ्यायचे असे त्याने ठरवले. तशी तयारी पण केली व मनोमन राम, सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चितेकडे निघाला एवढ्यात नवल घडले महाबली वीर हनुमान पुढे आले , भरतास वंदन करून त्याने श्रीराम येत असल्याची सूचना दिली.

भरताला खूप आनंद झाला त्याने शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा, श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा, सर्वत्र आनंदी-आनंद झाला नंदीग्रानापासून अयोध्यापर्यंत लोकांनी सुंगंधी पाण्याचा सडा टाकला. शंख, शिंगे, झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमू लागले. श्रीरामांचे पुष्पक विभानखाली उतरले. श्रीरामांच्या दर्शनासाठी सर्वांच्या डोळ्यात प्राण साठले होते. श्रीरामांच्या जयनादाने संपूर्ण अयोध्या नगरी दणाणुन गेली. भरत श्रीरामांच्या .पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला. भावाभावांची भेट झाली ते दृश्य पाहुन अयोध्या वासियांच्या डोळ्यात आनंदाश्रूंचा पुरच लोटला.


लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली गुढ्या उभ्या केल्या व आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस म्हणजे "गुढीपाडवा" तेव्हापासुन ही परंपरा सुरू झाली.