शौर्यगाथा मराठवाडा मुक्तीसंग्रामाची............

आपला भारत देश १५ ऑगष्ट १९४७ ला स्वतंत्र झाला परंतु मराठवाड्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य १७ सप्टेंबर १९४८ ला मिळाले.

शौर्यगाथा मराठवाडा मुक्तीसंग्रामाची............

आज १७ सप्टेंबर २०२३ म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष  म्हणून संपूर्ण मराठवाड्यात धुमधडाक्यात साजरे केले जाते. आपला भारत देश १५ ऑगष्ट १९४७ ला स्वतंत्र झाला परंतु मराठवाड्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य १७ सप्टेंबर १९४८ ला मिळाले. म्हणजेच जवळजवळ १३ महिन्यानंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या महाराष्ट्रातील संभाजीनगर(औरंगाबाद), जालना, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि हिंगोली या आठ जिल्ह्यातील भूमीला मराठवाडा म्हणून ओळखले जाते. याच मराठमोळी काळ्या मातीत मराठवाडा मुक्तीसंग्राम घडला . भारताचा आलमगीर बादशहा औरंगजेब याला याच मराठवाड्याच्या मातीत गाडल्यानंतर सर्वत्र धामधूम माजली होती.औरंजेबच्या मृत्युनंतर सय्यद हुसेन अलीने जिगरबाज मराठ्यांच्या मदतीने १७२० ला दिल्ली हस्तगत केली आणि निजामाला दक्षिणेचा सुभेदार नेमले. आणि हैद्राबाद संस्थानाला निझामांचे स्वतंत्र राज्य घोषित केले. तेंव्हापासून त्यांचा हिरवा झेंडा दिमाखात फडकू लागला. १९११ ला सत्तेवर आलेल्या शेवटचा निझाम मीर उस्मान अलीने पहिल्या महायुद्धात ब्रीटीशांना मदत केली. त्यानंतर त्याने हैद्राबादला स्वतंत्र इस्लामिक राज्य म्हणून घोषित केले. फारशी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिला. आणि उर्दूला शिक्षणाची भाषा केले.सरकारी नोकऱ्यामध्ये मुस्लीम समुदायाला जास्त लाभ दिला. मराठवाड्यातील जनतेवर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व राजकीय दडपशाहीला सुरुवात केली.

दक्षिणगंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदावरी व तिच्या उपनद्यांच पाणी पिणारी इथली माती माणसं काही औरच होती. प्राचीन काळापासून सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य आणि यादव अशा विविध राजवटी पाहणारी हि माती, छत्रपती शिवाजीराजे,छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्वजांची साक्ष देणारी हि माती, जगप्रसिध्द अजिंठा, वेरुळ लेणी, गुफा मंदिरे अनेक संतांचे नि पंथांचे राजवटीचे अनेक धर्मियांचे आश्रयस्थान असणारी हि माती,महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी आणि घृष्णेश्वर, वैद्यनाथ आणि नागनाथ असे ज्योतिर्लिंग विराजमान असणारी हि माती अन्यायाला सडेतोड निडर नि बेडरपने तोंड देणारी हि माती, अत्यंत लढाऊ, मर्दानी, बाणेदारपने लढणाऱ्यांची  हि माती जुलमी राजवटीच्या छाताडावर बसून त्यांची दाताड पडणाऱ्यांची हि माती नि माणसं. मर्दानी मराठवाड्यातील माणसांचे आंदोलने व विरोध मोडून काढण्यासाठी निझामाने कासीम रझवी याच्या माध्यमातून रझाकार संघटनेची स्थापना करून तिची वाढ केली. हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान व बहादूर नियाउद्दोला निजाम उल मुल्क आसफजाह याचे राज्य होते. त्त्यांनी रझाकार संघटनेचा वापर करून सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण केले. आपले राज्य टिकविण्यासाठी त्यांनी अन्यायी मार्गाचा वापर केला.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले पाकिस्तान वेगळा झाला. निझामाने स्वतंत्र भारतात सामील होण्यास नकार दिला. हैद्राबाद संस्थान वेगळेच ठेवावे किंवा पाकिस्तानात सामील करावे अशी त्याने अट घातली व रझाकारांच्या मदतीने त्याने येथील जनतेवर अत्याचार व रक्तपात करणे सुरु केले. निजामी राजवटीला जनता कंटाळली होती व आम्हाला स्वतंत्र भारतात सामील करावे अशी जनतेची तीव्र इच्छा होती. पण निझाम काही ऐकेना मुक्तीसंग्राम लढा जोर धरू लागला त्याचे नेतृत्व स्वामी रामानंद्तीर्थ करत होते. हैद्राबाद संस्थांमध्ये त्याकाळी तेलंगाना,मराठवाडा, कर्नाटक राज्याचा काही भाग होता. कासीम रझवी याने स्वातंत्र्य प्रेमी जनतेवर अनन्वित छळ सुरु केला तर दुसरीकडे मुक्तीसंग्राम लढा पेट घेऊ लागला. 

स्वामी रामानंद्तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगांबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, भाऊसाहेब, वैशपायन, देविसिंग चौहान,बाबासाहेब परांजपे, शंकरसिंग नाईक, विजेंद्र काबरा, अनंत भालेराव, कॉ. गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वात हा लढा पुढे सरकू लागला. गावागावात लढा पेटला यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल ऊडऊन देणारे काशिनाथ कुलकर्णी, मराठवाड्याची राणी लक्ष्मिबाई म्हणून प्रसिध्द असलेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहील्याना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापुरचे पोलीस ठाणे ऊडऊन देणारे लातूरचे हरिश्चंद्र जाधव, नळदुर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील होटी गावचे जनार्धन होटिकर गुरुजी, तसेच परभणीत रझाकारांना हुसकून लावणारे सूर्यभान पवार,नांदेड येथील देवरावजी कवळे, आदींच्या रूपाने मराठवाड्याच्या कान्याकोपऱ्यात हा स्वातंत्र्यसंग्राम तेजस्वी नि ओजास्वीपणे लढला गेला.

याबरोबरच जालन्याचे हुतात्मा जनार्धन मामा ,किशनसिंग राजपूत, राजाभाऊ ताकड विश्वनाथ भिसे, जयवंतराव पाटील इत्यादी वीरांनी जीवाची परवा न करता काम केले. एवढेच नव्हे तर [औरंगाबाद ]संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जातेगाव माळावर निजामांच्या सैन्याला अडविण्यात आले. यामध्ये मानसिंग राजपूत, लक्ष्मण अवचार, रामलाल राजपूत व रामचंद्र धन्देवार हे आघाडीवर होते. निजाम सरकारचे हे अत्याचार इतके अनन्वीत होते कि ठिकठिकाणी लोकांना जंगल्सत्याग्रह करावे लागले. गाड्या फोडल्या गेल्या, पोलीस चौक्या जाळण्यात आल्या.

शेवटी स्वतंत्र भारताचे गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी निझामाच्या विरोधात पोलीस कार्यवाहीची घोषणा केली. मेजर जनरल जे.एन.चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निझाम सरकार विरोधी धडक मोहिमेस सुरुवात झाली. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या.पाहटे चार {४} वाजता ऑपरेशन सुरु झाले. अवघ्या दोनच तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी, मनीगड, कनेरगाव, व विजयवाड्यातील बोनाकाळ ताब्यात घेतले. चाळीसगावाकडून आलेल्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल बिदर विमानतळावर भारतीय फौजांनी तीव्र हल्ले केले. १५ सप्टेंबरला औरंगाबाद सर करून फौजा पुढे घोडदौड करू लागल्या निझामी फौजेला पळताभूई थोडी झाली, त्यांच्या सैन्याने माघार घेतली व शेवटी कासीम नजवीला अटक झाली. हैद्राबादचे सेनाप्रमुख जनरल इद्रीस यांनी शरणागती स्वीकारली अशा रीतीने हैद्राबाद संस्थानांवर तिरंगा डौलाने फडकू लागला व १७ सप्टेंबर १९४८ ला मराठवाडा निझामाच्या जुलमी राजवटीतून व जोखडातून मुक्त झाला व त्याचबरोबर स्वतंत्र विदर्भ व तेलंगाना राज्यानिर्मितीचा डाव उधळून लावला व संपूर्ण भारत एकसंघ  झाला. त्या स्मृतीपित्यर्थ आज १७ सप्टेंबर सर्वत्र दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो व या स्वातंत्रवीरांवर खालील ओळी माझ्या ओठांवर तरळू लागतात.

निजमाची सत्ता |मराठवाड्यावर होती 
जुलूम किती |आम्ही सोसले ||१||

आम्ही सर्व होतो | त्यांचेच गुलाम
ज्याला त्याला सलाम | करावाच लागे ||२||

निजाम शाहीचा आमच्या | सैनिकांनी केला अंत
पाडले दंत | मगरुरांचे ||३||

शाहिरांनी गायिले | स्वातंत्र्य सैनिकांचे पोवाडे
जुलमी कवाडे | मोडणाऱ्यांचे ||४||

सुधा म्हणे नका करू | कुणाचाही जुलूम सहन
करून टाका दहन | क्रुर राजसत्ता ||५||

subhakarsinh chindhote

श्री. सुधाकरसिंह चिंधोटे ( केंद्रप्रमुख )
जि.प.प्रा.शा. कुंभारझरी ता.जाफ्राबाद