मराठी अस्मिता जपा

मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी मायबोली मराठी अस्मिता जोपासली जावी, महाराष्ट्राला अनेक थोर, महान साधुसंतांचा सहवास लाभला आहे. त्या महाराष्ट्राच्या पावन भूमीत मी जन्माला येणे स्वतःचे अहो भाग्य

मराठी अस्मिता जपा

महाराष्ट्राला अनेक थोर, महान साधुसंतांचा सहवास लाभला आहे. त्या महाराष्ट्राच्या पावन भूमीत मी जन्माला येणे स्वतःचे अहो भाग्य समजते. कारण या मातृभूमीला अनेक महान व्यक्तीचा अविस्मरणीय आणि अवर्णनीय इतिहास आहे. या पुण्यभूमीचा वारसा लाभले ही एक अतिशय अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कतृत्वाचा महान वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक ठिकाणी शुर, धाडसी, चपळ मावळ्यांचे रक्त सांडले आहे. आणि ही भूमी पावन झाली आहे. स्वराज्य घडविण्यासाठी किती संघर्ष करावा लागला त्यांना. दिवस रात्र ध्येयाच्या पाठीमागे लागले म्हणून तर त्यांच्या प्रयत्नामुळेच आपण आज स्वातंत्र्य उपभोगू शकतो. 
             
ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रगल्भ ज्ञानामुळे तर आपल्याला अनेक महान विचार मिळाले आणि त्या विचारांना जर आपण सर्वांनी कृतीत उतरवले तर त्यामुळे आपल्या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होणार आहे. अशा महान विचारवंताची पार्श्वभूमी लाभलेला महाराष्ट्र हा पूर्ण जगात गाजला आहे. संत ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ, संत तुकारामांचा तुकाराम गाथा, व्यास यांचे महाभारत, वाल्मिकींचे रामायण, श्री. चक्रधर स्वामींचे लिळाचरित्र, श्रीकृष्णाची गीता, असे अनेक महन ग्रंथ या भूमीमध्ये उगम पावले. आपण त्याचे व्यावहारिक उपयोजन करून त्याच्या पावित्र्याचे रक्षण केले पाहिजे. वेद आणि उपनिषदांचा महिमा आपणास लाभला आहे.
 
आजची तरुण पिढी ही या आधुनिक युगात भरकटत जात आहे. ही पिढी आपला अमूल्य वेळ भ्रमणध्वनी पाहण्यात गमावत आहे. हा अमूल्य वेळ त्यांनी वाचन करण्यात घालवला पाहीजे. यामुळे शब्दसाठा वृध्दींगत होण्यास मदत होईल. मराठी भाषेविषयी स्वाभिमान निर्माण होणार निश्चितच. मराठी भाषेविषयी अलोट प्रेम जागृती नक्कीच होणार आहे. अशी किमया फक्त या पृथ्वीवर मराठी भाषेत आहे. आपण सर्वांनीच मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणे गरजेचे आहे. आवश्यक आहे. मराठी भाषेबद्दल आपण नेहमी आदर बाळगला पाहिजे. आणि तो प्रत्येक कृतीतून सर्वांचा दृष्टीस आणि निदर्शनास यायला हवा आहे. मला खरोखरच असे वाटते की परकीय भाषेचे आकर्षण आपण स्वतःपासून कमी करायला हवे. 
         
ग्रामीण भागातील लोकांना जिल्हा परिषद शाळा न आवडता त्यांना इंग्लिश मिडीयमबद्दल जबरदस्त आकर्षण निर्माण झाले आहे. ते मराठी अस्मिता जपणुकिसाठी धोक्याचेच म्हणावे लागेल. उलट आपण सर्व मराठी आहोत तर आपणच मुलांवर मराठीचा मान ठेवण्यासाठी त्याच्यावर मराठी भाषेबद्दल, जिल्हा परिषद शाळा यांच्याबद्दल सकारात्मकता दाखवायला पाहिजे. अशी जर आपण स्वतःपासून सुरुवात जर केली तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार मराठी भाषेचा आदर हा घरोघरी राखला जाणार आहे. यासाठी पालकांनीच मुलांच्या मनावर मराठी शाळेबद्दल आदर निर्माण होईल असे भाषिक स्मप्रेशन देणे आवश्यक आहे. असे सकारात्मक वक्तव्य केले तर नक्कीच येणारी भावी पिढी ही मराठी भाषेची अस्मिता जपणारी, मराठीचा अभिमान बाळगणारा समाज झपाट्याने निर्माण होण्यास मदत होणार आहे.
         
वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी घरात दर महिन्याला नवीन निदान  दोन तरी नवी पुस्तके यायलाच हवी असा संकल्प प्रत्येक भारतीय नागरिकाने जर केला आणि तो मनःपूर्वक पाळला तर नक्कीच प्रत्येकाच्या मुखी मराठी भाषेची स्तुती निश्चित येणारच फक्त थोडा बदल करण्याची आवश्यकता आहे.

अनेक पवित्र तीर्थ क्षेत्र आपल्या  महाराष्ट्रात आहेत. अनेक धार्मिक ग्रंथ रामायण, महाभारत, गीता, कुराण, बायबल असे एक नाही तर अनेक धार्मिक ग्रंथ महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला मिळाले आहे.  हे खरंच खूप वंदनीय आहे. संस्कृतमधील वाचन सरावामुळे आपले उच्चार खूप सुस्पष्ट होतात. असा सर्वांगीण विकास करणारे अमर साहित्य आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकास लाभले आहे. ते खरंच आपले नशीब म्हणावं लागेल. प्रत्येक नागरिकाने या धर्मग्रंथात असणारी शिकवण आचरणात आणून त्याचे संस्कार मुलांवर करण्याचे कर्तव्य बजावणे खूप खूप आवश्यक आहे. असा रीतीने आपण मराठीबद्दल प्रेम, आवड निर्माण करू शकतो.
         
मराठी साहित्य खूप विस्तीर्ण आहे. त्या साहित्याची आवड आपण मुलामध्ये निर्माण करायला हवी, त्यामुळे सतत वाचनास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. सर्व भावी पिढीची पाऊले आपण मोबाईल दुकानाकडे न वळवता ती ग्रंथालयाला वळली पाहिजे. अशी प्रतिभा, प्रतिबिंब मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे, मराठी संस्कृतीचा जबरदस्त ठसा त्यांच्या मनावर बालपणीच रुजला गेला पाहिजे. असे ठसे उमटले की खूप मराठीप्रेमी आपणास निश्चितच पाहायला मिळणार आहेत. 
          
आपले भविष्य आपल्याच हातात असते या उक्तीनुसार आपला महाराष्ट्र आपल्याला मराठीकडे वळवायचा की  इंग्लिशकडे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. मराठीकडे जर पाऊले वळली तर नक्कीच सर्व जन सुसंस्कृत आणि संस्कारी निर्माण होतील, यासाठीच आपण प्रत्येकाने थोडसे जागरूक असणे गरजेचे आहे. गड किल्ल्यांच्या सतत सहली काढून त्यांना सतत त्याची इतिहासातील माहिती जाणीवपूर्वक सांगितली पाहिजे. अश्यामुळे मुलांना इतिहास कसा होता याची परिपूर्ण माहिती मिळेल. आणि ती चिरकाल स्मरणात राहील. 

Jayshree Arjun Munde

सौ. जयश्री अर्जुन मुंडे,
जि.प. उच्च प्राथमिक शाळा, 
गावंदरा, ता. धारूर, जि. बीड