गोष्ट तिच्या प्रेमाची एका कवी मनाची ह्रदयस्पर्शी प्रेमकथा

'गोष्ट तिच्या प्रेमाची' हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील एक दर्जेदार असा चित्रपट असून चित्रपटाचे कथानक ग्रामीण भागाभोवती फिरताना दिसते. धरणवाडी नावाचे छोटेसे खेडेगाव. गावातला न्याय गावातच करायचा अशी वाडीची परंपरा होती.

गोष्ट तिच्या प्रेमाची एका कवी मनाची ह्रदयस्पर्शी प्रेमकथा

माझ्या एका चित्रपट वेड्या मैत्रीणीमुळे मी वेगवेगळे चित्रपट बघू लागलो. मराठी चित्रपट सृटीतील प्रसिद्ध नट असलेला भूषण प्रधान यांचे चित्रपट तिला खुपच भावतात. भूषणचा अभिनय तिला खुप आवडतो. तिच्यामुळे मी भूषण प्रधानचा निवडुंग आणि पारंबी हे दोन चित्रपट बघितले आणि मी लेखक असल्यामुळे मला निवडुंग या चित्रपटाचे कथानक खुप भावले. त्यानंतर मी निवडुंग या चित्रपटाचे परीक्षण देखील दैनिकात लिहिले. माझ्या सिनेसृष्टीतील एका मित्राकडून भूषणचा भ्रमणध्वनी क्रमांक मला मिळाला. त्यामुळे भूषणसोबत माझे बोलणे झाले. भूषणला देखील परिक्षण आवडले. अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून मला मिळाली. त्यानंतर भूषणचा 'गोष्ट तिच्या प्रेमाची' हा चित्रपट माझ्या बघण्यात आला.

'गोष्ट तिच्या प्रेमाची' हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील एक दर्जेदार असा चित्रपट असून चित्रपटाचे कथानक ग्रामीण भागाभोवती फिरताना दिसते. धरणवाडी नावाचे छोटेसे खेडेगाव. गावातला न्याय गावातच करायचा अशी वाडीची परंपरा होती. या धरणवाडीत आक्कामाई नावाचे एक वजनदार प्रस्थ. आक्कांच्या शब्दापूढे कोणाचेच काही चालत नसत. सुमन नावाची स्त्री आक्कांची सुनबाई. आक्कांच्या मुलाचा अपघाती मृत्यू होतो. सुमन विधवा होते. तरूणपणी विधवा झाल्यामुळे सुमनचे दुःख खुप मोठे असते. तसेच गावातील शाळेत सुवास पाटील नावाचे गुरूजी रुजू होतात. पाटील गुरूजी चित्रपटात कवी दाखवलेले आहे. आक्काबाईचा वाडा मोठा असल्यामुळे गुरूजीची निवासाची व्यवस्था वाड्यातच केल्या जाते. वाडा पध्दत असल्यामुळे स्त्रीयांना बैठकीत येण्याची बंदी होती. एके दिवशी संध्याकाळी वाड्यात सर्व जन जेवायला बसतात. अन् अचानक आतील खोलीतून पैंजनाचा आवाज गुरूजीच्या कानावर पडतो. पैंजनाचा आवाज ऐकूनच गुरूजी पैंजनवाल्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. लेखक असो किंवा कवी हे कधीही चेहरा पाहून प्रेम करत नसतात. त्यांच्या मनात एखादी व्यक्ती बसली की, ते तिच्यावर मनापासून प्रेम करतात. त्याचप्रमाणे कधीही कुठल्या स्त्रीकडे न बघणारे कवी मनाचे पाटील गुरूजी देखील सुमनला न बघताच तिच्या प्रेमात पडले. हे चित्रपटाच्या प्रेमकथेचे विशेष आहे. 
 

सुमन देखील गुरूजींना चोरून बघत असे. गुरूजींचा साधा आणि सरळ स्वभाव सुमनच्या मनात बसला होता. गुरूजींना बघितल्यानंतर सुमनला खुप आनंद होत. त्यामुळे कुठल्यांकुठल्या कारणामुळे ती गुरूजींना बघत असत. अशाप्रकारे गुरूजी व सुमनचे प्रेम फुलत गेले. दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करू लागले. परंतू एका विधवा स्त्रीचे आणि गुरूजींचे प्रेम समाज मान्य करेल का? हा ही दोघांपूढे मोठा प्रश्न होता. कारण सुमन सरपंचाची मुलगी होती. आणि पंचकमेटीच्या सदस्या आक्कामाई यांची सुनबाई. परंतू प्रेम हे प्रेम असतं. ते कोणावरही होऊ शकतं. गुरूजींचे सुमनवर जीवापाड प्रेम होते. ते सुमनशिवाय जगूही शकत नव्हते. ती जर दिसली नाही की गुरूजी कासावीस व्हायचे. सुमन असल्याचा भास गुरूजीला होत. मग गुरूजी सुमनवर कविता लिहीत असे. गुरूजींनी सुमनवर लिहिलेली एक कविता अशी...
     

     भास होतो पाठीमागे 
     तुझ्या नाजूक पावलांचा 
     वास येतो तुझ्या केसातील 
     माळलेल्या फुलांचा 
     येतो आवाज कानाला
     पायातील पैंजनाचा 
     बटा सारता सारता
     वाजणाऱ्या कंकनांचा


सुमनही गुरूजीवर मनापासून प्रेम करत होती. ती नेहमीच गुरूजींचा आदर करायची कधीच एकेरी उल्लेख तिने गुरूजींचा केला नाही. आदरयुक्त प्रेम कसं असावं हे गुरूजी व सुमनकडून शिकावं. गुरूजी आणि सुमन खुप आनंदाने जीवन व्यतीत करत होते. परंतू गावात दोघांच्या प्रेमाची कुनकून लागली आणि न्याय करण्याकरिता पंचांची बैठक बोलविण्यात आली. एका बाजूने न्याय देणाऱ्या सरपंचाची सुमन मुलगी होती. आणि दुसऱ्या बाजुने आक्कामाईची सुनबाई होती. न्याय कसा द्यावा हे पंचापूढे मोठे धर्मसंकट होते.

बैठक बसली सुमन आणि गुरूजींना उभं करण्यात आले. बैठकीत देखील सुमनने गुरूजींचा आदरच केला. मी गुरूजीवर मनापासून प्रेम करते. हे स्पष्टपणे तीने सांगितले. तसेच गुरूजींनी देखील प्रेमाची स्पष्ट कबुली दिली. मी सुमनवर प्रेम केले आणि ते मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करेल असे गुरूजींनी स्पष्टपणे सांगितले. मला जीवनात कधीच कोणाचे प्रेम मिळाले नाही. प्रेम काय असतं हे मला सुमनमुळे समजले. खरं प्रेम असेल ना ते मोक्षापेक्षा कमी नसते. आणि मी सुमनवर मनापासून खरे प्रेम केले. प्रेम मोक्ष आहे. ज्याक्षणी एखाद्याला प्रेम मिळतं ना तेव्हा त्याला कशाचीच कमी वाटत नाही. असे गुरूजी बोलत होते. बैठकीत बसलेले शेकडो लोकं गुरूजींचे बोलणे शांतपणे ऐकत होते. भावनिक होत होते. काहींचे डोळे ओले होत होते.

पण न्याय तो न्याय असतो. पंच कमेटीत ठरविण्यात आले. सुमन तू गुरुजींचे प्रेम विसरून जा. आणि गुरूजीं तुम्ही आजच्या आज या गावातून कुठेतरी निघून जा परत या गावात येऊ नका. सुमनविषयी गुरूजींच्या मनात खुप प्रेम होते. परंतू न्यायापूढे कोणाचेच काही चालले नाही. म्हणून गुरूजी जड अतंकरणाने गावातून निघाले. सुमन गुरूजीशिवाय राहू शकत नव्हती. त्यामुळे सुमनही गुरूजींच्यामागेच पळत आली. तेव्हा गुरूजी गावातील धरणाजवळ आले होते. गुरूजींने मागे पाहीले तेव्हा गुरूजीचे डोळे भरून आले. सुमन देखील दायमोकळून मोठमोठ्याने रडू लागली. गुरूजी सुमनला समजावत होते. सुमन ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. सुमन धरणाच्या दिशेने पळत सुटली. गुरूजी देखील तिला थांबविण्याकरिता तिच्यामागे पळत होते. सुमनने पळत जाऊन धरणात उडी घेतली. तिच्या पाठोपाठ गुरूजींनी पण धरणात उडी घेतली. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. शेवटच्या श्वासापर्यंत मी सुमनला साथ देईल हा शब्द गुरूजींनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पाळला. अन् दोघांनी पण सोबतच अखेरचा श्वास सोडला. ज्यांनी कोणी आयुष्यात खरं प्रेम केले ना त्यांनी नक्कीच 'गोष्ट तिच्या प्रेमाची' हा चित्रपट पहावा. आणि ज्यांना खरं प्रेम करावा वाटत असेल त्यांनीही हा चित्रपट बघावा.

कदंव क्रिएशन निर्मित 'गोष्ट तिच्या प्रेमाची' या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि निर्मिती नरेंद्र आत्माराम ठाकूर यांनी केलेली आहे. तसेच गुरूजींची भुमिका भूषण प्रधान यांनी अप्रतिम पार पाडलेली दिसून येते. सुमनची भुमिका वैशाली चांदोरकर यांनी फार उत्तमरित्या पार पाडलेली दिसून येते. तसेच प्रिया बेर्डे यांनी आक्कामाई हुबेहूब साकारलेली आहे. तसेच प्रेमा किरण, विजय पाटेकर, अनिकेत केळकर, प्राजक्ता केळकर व ज्योती बावडणकर या कलाकारांचा अभिनय देखील उल्लेखनीय आहे. 

बाबा चन्ने, धोंदलगाव,
ता. वैजापूर
९६६५६३६३०३.