आई मराठी कविता - Aai Marathi kavita

सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित आई च्या प्रेमाचे वर्णन करणारी कविता आई ...

आई मराठी कविता  - Aai Marathi kavita

तुझ्या जिवाची पर्वा न करता
नऊ महिने उदरी वाढवलं
जन्म माझा होण्यासाठी
अपार कष्ट आहे सोसलं

माझा जन्म झाल्यावर
खरा आनंद तुला झाला
सोहळा माझ्या जन्माचा
केवळ तूच साजरा केला

काय सांगू तुझ्याबद्दल
मला काही शब्द फुटेना
आई तुझी आठवण 
मनातून काही जाईना

ठेच लागली मला कधी
तूच सांभाळून घेतलंस
छोट्याशा या आयुष्यात
मला जगायला शिकवलंस

जगाची ही दुनियादारी
तुझ्यामुळे माहीत झाली
तुझी स्वप्ने तू माझ्यासाठी
मनामध्ये दाबून ठेवली

आई तुझ्या उपकाराचे
ऋण कसे मी फेडू गं
तुझ्याशिवाय जगात
कसे जगून दाखवू गं

आहेस तू सोबत माझ्या
भय कसले मला असणार
फक्त तुझ्या सुखासाठी मी
सारं काही सहन करणार

तू फक्त आनंदी राहावीस
बाकी काही नको मजला
स्वीकार कर माझे आई
साष्टांग दंडवत हे तुजला

किती वर्णू ख्याती तुझी 
गाऊ किती गुणगान
तुझी आठवण येताच गं
विसरते भूक तहान

सौ. प्रिती भालेराव, पुणे