राखीपौर्णिमा सण हा
भाऊ बहीण नात्याचा
कधीच न तुटणाऱ्या
प्रेमळ अशा बंधाचा
लहानपणापासूनच
तू खुप भांडायचा
कधी वेळ आलीच
माझे कान धरायचा
शिस्त म्हणजे काय?
तुझ्याकडूनच शिकले
आयुष्याचे कित्येक धडे
तुच मला शिकवले
तुझं माझं नात आहे
खूपच जगावेगळं
आत्तापर्यंत सांगितलं मी
माझ्या मनातलं सगळं
माझ्या प्रगतीसाठी
तुझी तळमळ असते
कधी कधी मी सुद्धा
भानावर मग नसते
कधीतरी मला चुकून
थोडा नीट बोलायचा
राग आला कधी तुला
तर मला खूप ओरडायचा
तुझ्या निस्वार्थी प्रेमाची
खरी ताकत सोबत आहे
येणाऱ्या प्रत्येक संकटावर
मी हसत मात करत आहे
किमान आजच्या दिवशी
मला भेटायला येशील का?
आयुष्यभर कायमस्वरुपी
मला साथ देशील का?
वेळप्रसंगी होतोस
माझा पाठीराखा
दादा फक्त तूच आहेस
माझा प्राणप्रिय सखा
तुझी वाट पाहताना
माझे मन भरून आले
काय सांगू दादा तुला
नकळत डोळे ओले झाले
सौ प्रिती भालेराव, पुणे