प्रेम झरावे...

सौ. सारिका बद्दे लिखित मराठी कविता प्रेम झरावे...

प्रेम झरावे...

बुडता तारा तरून यावा
सांज खुलावी होऊन गाणे
आणि फुलावी केशरकांता
घेऊन माझी पिवळी पाने

उडून येता नभाखालुनी
उनाड वारा घेऊन पाणी
क्षितिजास ही कळून यावी
दसदिशांची भविष्यवाणी

कालप्रवाह वाहून जाता
अचल व्हावा विखार मासा
अनाम तृप्ती उतरू यावी
तुटून जावा प्रहर फासा

दुर्गम जेथे होती वळणे
तिथे रुजावी सखोल नाती
निळे पाखरू बिलगावे अन
फिरून यावी हिरवी ख्याती

वत्सल व्हावे या गगणाने
धरेने मग छत्र धरावे
नजरेमध्ये येता श्रावण
गालावरती प्रेम झरावे.

Sarika Badde

सौ. सारिका बद्दे,
ढोरकीण, ता. पैठण