आठवण Marathi Prem Kavita

पुनम सुलाने लिखित मराठी कविता आठवण

आठवण Marathi Prem Kavita

तुला सहज आठवायचं म्हटलं
की, नकळतपणे शब्दांची गर्दी जमते
विस्कटलेले ते शब्द सारे
जोडले की,मग एक कविता बनते

तुझ्या आठवणीतला प्रत्येक शब्द
अंतर्मनात हळुवार गुंजत राहतो
रातराणीच्या गंधापरी
श्वासात माझ्या तू दरवळत राहतो

तुझा तो नजरेचा स्पर्श
कधीतरी नकळतपणे झालेला
डोळ्याच्या पापण्याआड 
अजूनही तसाच जपलेला

मनाच्या कोऱ्या कागदावर 
चित्र प्रेमाचे तू रेखाटलेले
भरण्यास रंग परतून येशील तू 
म्हणूनी मी अजूनही तसेच जपलेले 

अवतीभोवतीच्या जगामध्ये 
रोज काहीतरी नवीन घडत असतं 
माझ्यासाठी मात्र तू आणि तुझी आठवण
या व्यतिरिक्त दुसरं काहीच नसतं

Poonam Sulane

पुनम सुलाने
जालना