ओढ मराठी कविता

कु. रोहिणी पंडीत मोरे लिखित मराठी कविता ओढ...

ओढ मराठी कविता

खडकाळ माळराणी अशी चाफेकळी फुलली,
नदी अन् धबधब्याची मिलनाची वेळ  आज आली
सुंदर मनमोहक सौंदर्य नजरे ला भाळून गेलं,
नदी अन् धबधब्याचं मनसोक्त वाहणं चालू झालं...

त्याचं ते वाहणं फक्त वाहणंच असेल का?
का असतील त्याच्याही गर्भात यातना दुःखाच्या...

खळखळत नव्हता तो, तो तर मनमोकळं अश्रू ढाळत होता,
मुक्या असलेल्या वेदना त्याच्या अशा फुलवत होता
अगदी वर्ष झालं होतं त्यांच्या भेटी-गाठीला
वर्षभर धरून ठेवलं होत तीने त्याला वेठीला...

मेघराज्याच्या आगमनाचा निरोप घेऊन,
आली होती ती सळसळणारी नागीण होऊन
तिच्या येण्याने त्याला सौंदर्य मिळालं,
तिच्या सहवासनं त्याच दुःख जळालं.

तिच्या येण्यानं भावनांना पूर आला,
हृदयाचा पाझर तिच्यात विलीन झाला...
पाखरू मनाचे उडेल का घरट्यात निजलेले,
सांजवेळी खुलेलं का रूप तिच्यात भिजलेले...

तिच्या सोबतीने सारा शिवार त्याचा होतो,
तिच्या सोबतीने सारे आभाळ कवेत घेतो..!
तिच्या जाण्याने माळरान ओस होते,
तिच्या जाण्याने हृदय दुभांगून जाते..!

अशी येत जा तू नको फिरू पुन्हा माघारी,
तुझ्या सोबतीने जाऊया त्या क्षितिजावरी...
तुझ्या सोबतीला पाहून वेडे, आसमंत गहिवरतो आहे...
तुला आलेलं पाहून मी मनसोक्त दरवळतो आहे...
मनसोक्त दरवळतो आहे...

Rohini Pandit More

कु. रोहिणी पंडित मोरे,
नाटेगाव, ता. कोपरगाव, 
जि. अहमदनगर