तीळ मराठी प्रेम कविता - Marathi Prem Kavita

बाबा चन्ने लिखित प्रेयसीच्या सौंदर्यांची वर्णन करणारी कविता तीळ

तीळ मराठी प्रेम कविता - Marathi Prem Kavita

खुणावतो मज सखे
अधराचा तीळ तुझा,
एकटक पाहताना
तडफडे जीव माझा...

एकरूप भान होई
जसे राजहंस भोवती,
 करी अलग दुधास
 मन तसेच मोहती...

पाकळ्यांत मोहमयी
तीळ छुपा सजलेला,
खुळा जीव होऊनिया
तीळ-तीळ तुटलेला

जळी-स्वप्नी मज दिसे
चमकतो तीळ वेडा,
अलगद् विसावतो
तुजपाशी जीव थोडा...

दूर जरी तनमन
प्रीत जडली त्यावरी,
हजारदा घेतो मग,
त्यास चुंबून जवळी...

तुझा तीळ गोड किती
 माझ्या भावतो मनाला,
 सौंदर्याचा घाट किती
 लाभे गोंडस रूपाला...

तुझ्या माझ्या मिलनाचा
तीळ होई साक्षीदार,
माझ्या मिठीत खोलेल
प्रितीचे गूज अलवार...

बाबा चन्ने, धोंदलगाव, ता. वैजापूर