हो, प्रेम असं असतं...!

संदीप प्रभाकर कुलकर्णी यांनी खऱ्या प्रेमावर आधारित लिहिलेली कविता हो, प्रेम असं असतं

हो, प्रेम असं असतं...!

सुरकुतलेल्या चेहऱ्यानं 
डॉक्टरांच्या प्रतीक्षेत 
हॉस्पिटलच्या बाकावर
काळजीत बसलेलं असतं
हो, प्रेम असं असतं...! 

शाळेची घंटा वाजताच 
गर्दी सारून पुढं येत,
दप्तर घेऊन येणाऱ्या
लेकीला शोधत असतं 
हो, प्रेम असं असतं...!

दहावीच्या अंतिम वर्षाला 
मुलाचा रिझल्ट पाहताच 
डोळ्यांतल्या अश्रूसह
ते सुखावलेलं असतं 
हो, प्रेम असं असतं...! 

सायकलवर टांग मारून 
वाकडीतिकडी वळणं घेत 
बापाला डबा द्यायला 
ऑफिसात पोचलेलं असतं
हो, प्रेम असं असतं...! 

थकून आलेल्या लेकाला 
भरभर जेवायला वाढून 
शेजारीच बसून त्याच्याकडं 
डोळे भरून पाहत असतं
हो, प्रेम असं असतं...! 

रात्रीच्या काळ्या अंधारात
एकट्यानंच चालत रस्त्यानं
माहेरी गेलेल्या बायकोला 
हळू हळू बोलत असतं 
हो, प्रेम असं असतं...! 

याच दिवशी दाखवावं प्रेम 
असं कधीच काही नसतं 
प्रेम कुणाचंही, कुणावरही 
निरंतर, चिरकाल असतं
मित्रांनो... प्रेम असं असतं...! 

Sandeep Prabhakar Kulkarni

संदीप प्रभाकर कुलकर्णी, औरंगाबाद.