बाप्पा मराठी कविता - Marathi Kavita

सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित बाप्पा मराठी कविता मध्ये बाप्पा बद्दलची ओढ व प्रेम व्यक्त केले आहे.

बाप्पा मराठी कविता  - Marathi Kavita

निघाले होते बाप्पा
तुला जेव्हा मी घेऊन
तुझ्या मूर्तीकडे पाहिले
गेले मी भान हरपून

सुंदर निरागस तुझं रूप
नयनात माझ्या बसलं
जगावेगळं सुख असं हे
फक्त तुझ्या रूपात दिसलं

भालचंद्र गजानना तू
किती मनमोहक तुझे रुप
मनामध्ये साठवावे असे
आहे तुझे गोड स्वरूप

नेसलासे पितांबर
केशरी रंग ज्याचा असे
सोन्याहूनी पिवळे
उपरणे शोभून दिसे

अलगद हातात धरली
बाप्पा मी तुझी मूर्ती
शब्दांना आला बहर
अद्भुत आहे तुझी किर्ती

पाहताच माझ्याकडे 
बाप्पा तू कसा हसलास
घरी येण्यासाठी तूही
किती आतुर झालास

थांबलो की रे वर्षभर
किती प्रतीक्षा केली तुझी
सकल देवांचा अधिपती तू
फक्त तुझ्यावरच श्रद्धा माझी

तुझ्याशी गप्पा मारता मारता
घर कधी आलं समजलच नाही
झालं एकदाचं आगमन तुझं घरी
माझे मन रे तुला न्याहाळून पाही

सौ. प्रिती भालेराव, पुणे