सुखाचा श्वास मराठी कविता - Breath of Happiness Marathi kavita

सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित मराठी कविता सुखाचा श्वास - Breath of Happiness Marathi Poem

सुखाचा श्वास मराठी कविता - Breath of Happiness Marathi kavita

मतलबी या दुनियेत
आपलं असं काही नसतं
कुणासाठी कितीही करा
सार काही कमीच असतं

सुखाच्या शोधात
आयुष्यभर फिरला
सुख मिळेल का कुठे
हे शोधूनच दमला

गरजेपुरती नाती सर्व 
नाही देत कुणीच साथ
वाट मात्र पाहिली तू
देईल कुणी हातात हात

खरं सुख कशात आहे
तुला कधी कळलच नाही
सार काही कळूनसुद्धा
जीवनाचं गणित सुटलं नाही

अवघड असतं या जगात
जगणं सुध्दा मुश्कील आहे
दुःख आणि त्रास रोजच
पाठलाग करत आहे

माणसा तू वेडा आहे खूप
जगाची पडली भूल तुला
तोडून टाक मायापाश सारे
व्यथा ही कशी सांगू तुजला

चार दिवसाचं प्रेम खोटं
क्षणात नष्ट होईल रे
मेल्यावरती बहू सुखाचा
श्वास तू थोडा घेशील रे

 सौ. प्रिती सुरज भालेराव, पुणे