आयुष्याच्या परिभाषेचा अर्थ लावतांना
का सुचू नये शब्द , का भासावे सर्व धुसर
श्वासागणिक विनत गेलेले रेशीम धागे
आयुष्याच्या रंगमंचावरील बहुरंगी कलाकुसर …
मी देते शब्दांना अर्थ की अर्थहिन शब्द माझे
अगणित अपेक्षांचे मी स्वतःवरच लादलेले ओझे
धावते कधी मी भावनांच्या मागे अविरत अनिर्बंध
स्वतःच स्वतःला उमगू नये हे मनाचे किचकट द्व्ंद…
धावता धावता वाटे कधी घ्यावा पुर्णविराम
पण पुन्हा दृष्टीपटलात येतात जगण्याचे नवे आयाम
पुन्हा नवी ध्येयं पुन्हा स्पर्धेची गर्दी
जीवनाच्या रंगमंचावरची मी रसीक तितकीच दर्दी…
कधी कधी वाटते
काय असेल या हाडामासाच्या देहाचे प्रयोजन
या देहामध्ये चैतन्य टाकतांना
विधात्या असेल का तुझे काही नियोजन….?
तू कर्ता करविता की स्वतंत्र माझे अस्तित्व
पंचमहाभुताचा देह शेवटी मातीचेच तत्व
हा देह स्वतंत्र हा आत्माच परमेश्वर
तरीही प्रत्येक जीव शोधतोय या भुतलावर ईश्वर ….
हे चक्रव्यूह भेदने इथे सर्वांनाच जमत नाही
स्वतः मधला परमेश्वर स्वतःला कधी भेटत नाही
मी जाते बौध्दाजवळ कधी अंगिकारते ज्ञानेश्वर
त्यांच्या विचारांत ब्रम्हांड की विचाराअंती परमेश्वर…
मी स्वतः म्हणतांनाही मला माझ्यातला मी गवसत नाही
विचाराच्या गुंत्याची घट्ट गाठ उसवत नाही
मी शोधतेय मार्ग उगमाचा अंताचा
हा खेळ जन्मोजन्मीचा का पूर्व जन्मसंचिताचा
ईश्वर भेटेल न भेटेल पण भेटावा जगणयाचा अर्थ
तोच खरा मोक्ष अन् तोच खरा परमार्थ
तेच समाधानाचे अत्यूच्च शिखर
अन् त्यानेच व्हावे जीवन कृतार्थ….
मग छेडली जावी धुन अंतरीची
अन् स्वैर उमलावे संवेदनांचे तरल गाणे
काळोखाच्या विळख्यातून निसटलेले
लख्ख प्रकाशाचे तराणे ……
सौ. कल्पना रवींद्र बनसोड, औरंगाबाद