दुमदुमला सहयाद्रीत नाद
वाजती बघा सनई चौघडा
जन्मदिनाचा अपूर्व सोहळा
पाहूनी धन्य शिवनेरी गडा
बाल मनावर संस्कार घडवी
धन्य कणखर माय जिजाऊ
शूरवीर , नरसिंह, प्रतापी
शिवरायांचे गुणगान गाऊ
चोहीकडे दारिद्र्य पसरले
पोटी रयतेच्या भुकेचा डोंब
मोगलांच्या अत्याचाराची
सगळीकडे माजली बोंब
अशा परिस्थितीत जन्मती
शिवरायास होई त्याची जाण
स्थापन करण्या हिंदवी स्वराज्य
सवंगड्यासहीत घेती आण
करुनी गडावर गड सर
मर्द मावळे करती धमाल
लढूनी गनिमी काव्याने
उलटून लावी शत्रूची चाल
दिल्लीची पातशाही ही
केली हैरान मराठ्यांनी
शत्रु झाले भयभीत सारे
चारली धूळ रणांगणी
शिवराय आदर्शाची खान
परस्त्रीस माऊलीचा मान
होता ललनेवर अत्याचार
तलवार सोडी ही म्यान
आली होती वेळ आता
स्थापण्यास रयतेचं राज्य
झाला होता रायगड आता
राज्याभिषेकास सुसज्ज
सप्त नद्यांचा करुनी जलाभिषेक
मंत्रोच्चारात सोहळा पार पडी
रयतेचा राजा, शिवराय छत्रपती
सुखावे प्रजा , अभिमानाची घडी
आस मनी आज पुन्हा जागते
शिवराय यावे हे परत आमचे
नांदावे पुन्हा, सुराज्य रयतेचे
शिवरायासारख्या प्रतीपालकाचे
सौ. विजेता चन्नेकर,
मु. पो. अंजोरा, ता. आमगाव,
जि. गोंदिया