संविधान महाग्रंथ

जया विनायक घुगे-मुंडे लिखित मराठी कविता संविधान महाग्रंथ

संविधान महाग्रंथ

तो बाप माझा एक खरा
न्याय सन्मान देऊन गेला,
जन्मोत्सव आज त्याचा
निखाऱ्यात उजळून गेला...

बाबासाहेब अमर नाव
चहूदिशांनी किर्ती घुमते,
देवांचा देव जाणिला
कर्तृत्वाची साक्ष उरते...

किती यातनांच्या पायघड्या
प्रारब्धात लिहील्या होत्या,
परि न डगमगला हिरा हा
तेजोमय पायवाटा उजळल्या...

अगाध महिमा भीमाचा 
नसे दूजी तोड तयाला,
किती आठवावे ते कर्म
त्यामुळेच झळाळी भारताला...

विजयाची पताका त्याने
होती मनामनांत रोवली,
सत्याची प्रचिती वास्तवात
सत्कार्याची वाट दावली...

भीमा माझा महत्तम एक
मनामनांत अमर राही,
या वीराची किर्ती साऱ्या
विश्वात कणकण गाई...

संविधान महाग्रंथ सदा
प्रेरणा देईल थोरामोठ्यांस,
हीच अमुची गीता अन्
हेच देई शांती आत्म्यास...

Jaya Ghuge Munde

श्रीमती. जया विनायक घुगे-मुंडे
जिल्हा परिषद शिक्षिका, गावंदरा
परळी(वै.),जि.बीड