धरणीची लेक Marathi Kavita

सौ.विजेता चन्नेकर लिखित मराठी कविता धरणीची लेक...

धरणीची लेक Marathi Kavita

मीग धरणीची लेक
माझी माय काळी माती
तिच्या कुशीत विसावा
तिच्याशीच जुळे नाती

रक्तवर्णी  पातळ्यात
तेज दिसते उठून
चाल माझी झपाझप
चाळ करी रुणझुण

वर आभाळाची छाया
खाली हिरवीच धरा
पायी चालत निघाले 
गवताचा डोई भारा

संग ढवळ्या पवळ्या 
सान गोजिरी पाखरं
यांच्या सोबतीत वाटे
सुख कष्टातही न्यारं

कष्टकरी आम्ही लोकं
खाऊ कष्टाची भाकरी
भगवंत पाठीशी तो
करू इमाने चाकरी

गाडी जमीनजुमला
खोटी सारी बघा शान
माणसाने जपावा रे
सदा आपूला इमान

Vijaya Channekar

सौ.विजेता चन्नेकर भुमर गोंदिया