सरणाऱ्या साला तुला
अखेर निरोप दिला,
आयुष्याच्या प्रवासात
स्वीकार तुझाही केला.
सरलास तू सहज असा
क्षणोक्षणी जाणले मी,
किती सुख-दुखांच्या
कहाणी घडविल्या मी.
एक-एक दिवस सजवून
मनात माझ्या कोरलेला,
हसू-आसूंच्या कथेने जणू
सांजवारा असा रंगलेला.
काय विसरू नि सोबतीला
काय घेऊन चालू पुढे,
देते निरोप साशंक मनाने
येवो बहर हेच साकडे.
पापणीच्या शंका पुसूनी
आशेची चमक नव्याने भरली
माझा निरोप घेऊन गड्या
चाल नवी तू का खेळली.
नव्याचे क्षण खुणावती
लक्तरं मी तुलाच परतली,
नव्या क्षणांच्या स्वागतास
जीवनबाग बघ बहरली.
अखेरचा निरोप देऊनी
नववर्षी पाऊल टाकते,
नवस्वप्नांची गाथा अंतरी
पुन्हा नव्याने सजवते.
जया विनायक घुगे-मुंडे
जिल्हा परिषद शिक्षिका गावंदरा
परळी(वै.), बीड.