शरद ऋतूच्या प्रारंभी येतो
शारदीय नवरात्र महोत्सव
सवाष्ण करती दुर्गास्थापना
नऊ दिवस चाले हा उत्सव...
सुर्यमंडली जिचे वास्तव्य
धनुष्य,बाण गदा चक्रधारी
दृष्ट चक्र निवारिणी माता
सिंहारूढ ही अष्टभुजधारी...
नऊ दिवस हे मांगल्याचे
अलौकिकतेचे होई दर्शन
करता उपासना दुर्गादेवीची
होई दुःख भोग पापक्षालन...
करता सुचिर्भूत देवी मूर्ती
होते शक्तीतत्वांची निर्मिती
वलयांकित त्या प्रकाशातून
निर्गुण शक्तीतत्वे आकृष्टती...
अबोली तेरडा झेंडू अनंत
नऊ माळांचा चढता साज
तेजोमय प्रकाशात खुलतो
मुखवट्यावरील दिव्य ताज...
त्याग, समृद्धी नि पावित्र्याचे
नऊ रंग मांगल्याचे प्रतीक
उत्सवात भरती आनंदी रंग
परिपूर्ण हे निसर्गाचे द्योतक...
सौ. नीता यशवंत भामरे, नाशिक