मी सज्ज झाले आहे...

सौ. वृषाली अमोल पाटील लिखित मराठी कविता मी सज्ज झाले आहे...

मी सज्ज झाले आहे...

कोणी कधी चांगले तर
कोणी वाईट ठरवले आहे
ज्यांना जशी भासले मी
त्यांनी तसे मानले आहे
  
सजवून स्वतःला कितीदा
आरशात पाहिले मी
कोणी अतिशय सुंदर
कोणी कुरूप ठरवले आहे

आयुष्याची वाट मी
रोजच मळते आहे...
कोण आपले, कोण परके
नव्याने कळते आहे...
  
खुशाल करा 'वाहवा'
माझी कोणी कितीही
मनीचे गुज तुमच्या
पुरते मी ओळखून आहे

चुकले असेन मीही
मीपण माणूस आहे
का जो तो मजला संतांच्या 
तराजूत तोलत आहे...

नशिबाने माझी ओटी
सुखाने भरली आहे
असते दुःखी म्हणे मी
तो त्यांचा अंदाज आहे

फसव्या या जगाची 
आता अपेक्षा नाही
स्वतःला सिद्ध कराया
मी सज्ज झाले आहे...

Vrushali amol patil
 
सौ. वृषाली अमोल पाटील,
कोगनोळी, जि. बेळगाव (कर्नाटक)