कान्हा मराठी कविता

सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित गोकुळाष्टमी चे वर्णन करणारी कविता कान्हा

कान्हा मराठी कविता

कुणी गोविंद घ्या
कुणी गोपाळ घ्या
यशोदेच्या बाळाला
अलगद उचलून घ्या

मथुरेचा कृष्ण असा
देवकीगर्भी जन्माला
नंदाचा नंदनू कान्हा
गोकुळात वाढला

शिंकेची तोडीतो
मटकेची फोडीतो
खट्याळ हा कान्हा
खोड्याच काढितो

यमुनेच्या त्या तीरावर
गोपिकांचा मेळा जमला
वाजवितो पावा कृष्ण
गोपिका कशा दंगल्या

मुरालीचा मंजुळ ध्वनी
गोपिकांच्या पडे कानी
रंगी रंगला श्रीरंग असा
अजुनी त्या वृंदावनी

पेंद्या बोबड्या सुदाम्या
जमली सारी सवंगडी
करण्यास कालिया मर्दन
कृष्ण घेई यमुनेत उडी

गोपाळ कृष्ण अनंता
पद्मनाभा नारायणा
तूचि रक्षण करिसी
हे देवा जनार्दना

सौ. प्रिती सुरज भालेराव, पुणे