आमच्या गावचा पांड्या
हाय लईच नटखट
शायेत जानं त्याले
वाटते नुसती कटकट
येय झाली शायेची का
लपून जाते आंगधुनीत
माय बसते मंग त्याची
सारा मोहल्ला धुंडीत
आवडत होतं त्याले
फुलपाखरांमागं धावाले
निसर्गातल्या गमतीजमती
जाइ शाया सोडून पाहाले
मास्तरीन पाठवे रोज
पोराइच्या हातानं निरोप
पांड्या पाई बापालेबी
लागत नाई झोप
एक दिवस मने बाप
बापू शाया नाही वैरी
जीवनातल्या यशाची
हाय पयली पायरी
शायेत जायची तुले
काऊन वाटते रे कटकट
आम्हालेबी नाई आवडत
तुया मांग कराले वटवट
शिकून-सवरून शाना हो
शायेत जारे लेकरा
ज्ञानानंच बय येते
आंगात माया पाखरा
पांड्यालेबी समजलं तवा
शाया शिकाचं महत्व
जो शायेत जाई रोज
त्यांचं ज्ञानावर प्रभुत्व

सौ. विजेता चन्नेकर (भुमर)
मु.पो.अंजोरा, तह. आमगाव,
जि. गोंदिया
