जिच्यात मला मिळालं
मोकळ निरभ्र आकाश
चंद्र चांदण्यांचा सोबत
लख्ख करणारा प्रकाश
कधी भेटते अलगद तिच्यात
सरिता खळखळ वाहणारी
काठावर तिच्या बसून
प्रियसी वाट पाहणारी
कधी असतात तिच्यात
गुलाब फुले हसताना
आणि पाऊस येतानाचा
मनमोर बिनधास्त नाचताना
कधी येते समोर माझ्या
मीरेची होऊन भक्ती
तर कधी येते ती घेऊन
चण्डिकेची शक्ती
कोणी नाही तिला वर्ज्य
अगदी काटेरी बाभळही
आणि विस्तीर्ण, मोकळं
पसरलेले आभाळही
नेते कधी तरी ती
बाईला तिच्या माहेरी
जरी कितीही आनंदात
असली तिच्या ती सासरी
बसून सुखदुःखाच्या,
ऊन-पावसाच्या हिंदोळ्यावर
बोलू लागते मग ती
प्रत्येकाच्या आयुष्यावर
अशी असते कविता
सगळ्यांना सामावून घेणारी
अंधारातून प्रकाशाकडे
नेहमीच घेऊन जाणारी
म्हणूनच कविता माझी
ओळख आणि वाट आहे.
कमी शब्दात भावना
जागवणारी माझ्यासाठी
नवीन पहाट आहे......
माझ्यासाठी नवीन पहाट आहे.
✒️✒️✒️✒️✒️✒️
सौ. जयश्री जगताप
सातारा