क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले Marathi Kavita

सौ. जयश्री अविनाश जगताप लिखित मराठी कविता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले..

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले Marathi Kavita

ज्ञानाचा दिवा पुन्हा उजळवण्या
 ज्ञानदिव्यातील ग वात होऊनी 
पुन्हा जोतिबाची सावित्री बनूनी 
येशील का ग माऊली परतुनी? 

झालोय आम्ही शिकून सुशिक्षित 
पण नाही ग झालो सौदामिनी
अजूनही धीर देण्या, सावरण्या
ये कडाडून  पुन्हा वीज  होऊनी 

तूच प्रेरणा, तूच ग आदीशक्ती 
तूच आमची खरीखूरी दामिनी 
त्या बलात्कारी नजरांना  ठेचण्या
तू ये ग आम्हा सोबतीण म्हणुनी 

मुक्तीची क्रांतीमशाल पेटवण्या 
वाट पाहतोय आम्ही साऱ्याजणी 
आली होतीस तेव्हा मार्ग होऊनी 
येशील का आताही वाट बनूनी 

आताही खास वंशाच्या दिव्यासाठी 
पणती टाकतात गं विझवूनी 
गर्भातील कलिकेला वाचवण्या
येशील का ग चंडिका  बनूनी? 

भरलाय मनी द्वेष माणसांच्या 
साऱ्यांची हृदये गेलीत ग  विटूनी   
वाटा साऱ्या मनामनाच्या   सांधण्या
येशील का ग माऊली परतुनी? 

Jayshree Jagtap
सौ. जयश्री अविनाश जगताप, 
सातारा