झाडे मिळुनी लावूया

सौ. पुनम सुलाने लिखित मराठी कविता झाडे मिळुनी लावूया

झाडे मिळुनी लावूया

श्वास शहरी कोंडला
नातं मातीशी जोडूया
ऋण फेडण्या अवनी
झाडे मिळुनी लावूया 

पक्षी, झाडे, पाने, फुले
चित्र लोचनी भरुया
सृष्टी करण्या शुंगार
झाडे मिळुनी लावूया 

ओल्या मातीचा सुगंध 
चला श्वासात भरुया
रान पाहण्या हिरवे
झाडे मिळुनी लावूया 

नवी चैतन्य पहाट
गीत आनंदी गाऊया
झोके बांधण्यास उंच
झाडे मिळुनी लावूया 

सजलेली ही धरती
भेट पिढीस देऊया
श्वास मिळविण्या नवा
झाडे मिळुनी लावूया 

Poonam Sulane

पुनम सुलाने जालना