चला रंग खेळूया

सौ. जया विनायक घुगे - मुंडे लिखित मराठी कविता चला रंग खेळूया

चला रंग खेळूया

मानवतेच्या दुनियेत
किमया अशी झाली,
समता, प्रेम, ममता
बेरंग बघा झाली...

आपल्या दूनियेतील 
रंग पुन्हा परतवूया,
सारे मिळून एकजुटीने
चला रंग खेळूया...

रूदयाची कुप्पी थोडी
उघडून पाहूया,
अशा, प्रेम, माणुसकीची
एक, एक चिमूट घेऊया...

उदासलेल्या मनामनांवर
हलकेच उधलूया,
मनामनातील द्वेष असा
नाहीसा करूया...

अहंकार, गर्व बाहेर काढुनी
आनंदाचे रंग भरू,
रंगीबेरंगी विचारांची
होळी साजरी करू...

निसर्गाचा हिरवा रंग
अवकाशाचा निळा रंग,
परिधान करुनी विविध
जगण्यात होऊन जाऊ दंग.

शब्द रुपी रंगांची
उधळण करूया,
या रे या सारे मिळूनी
चला रंग खेळूया...

Jaya Ghuge

सौ. जया विनायक घुगे - मुंडे
परळी वैजनाथ, बीड