आयुष्य एक लढा!

भयविरहित जीवन कसं जगावं, आणि आयुष्यात कोणतीही संकटं, आव्हानं समोर आली तरी आयुष्यात जगायच कसं....

आयुष्य एक लढा!

"आयुष्य' हा शब्द ऐकला की सागराची आठवण येते, सागराला जसा किनारा सहज मिळत नाही. तसं आयुष्याचं गणित असतं. आयुष्यात  कोणत्याच गोष्टींचा किनारा सहज मिळत नाही. सुख-दुख, प्रेम, आनंद, तिरस्कार या सगळ्या आयुष्याच्या सागरात असणाऱ्या गोष्टी आहेत. 'सुख' कधी येतं आणि जातं हे समजत सुद्धा नाही. दुःख नियमीत पाटलाग करत असतं. 'प्रेम' तर शिराळासारखे कधी मिळते तर कधी मिळत पण नाही. त्याचे अस्तित्व शिराळाइतकेच असते. 'आनंद' मनात उत्साह असेल, सगळे व्यवस्थित असेल तरच आनंदी-आनंद असतो. पण तो नेहमी कधीच नसतो. तिरस्कार हा तर प्रत्येकाला प्रत्येकाकडून मिळतो. त्याची काहीच कमतरता नसते. 

आयुष्यात कधी काय घडेल? हे आपण सांगू शकत नाही. जशा सागरात लाटा कधी उसळतील याची काही वेळ नसते. तसे पूर्ण आयुष्य एक गुपित आहे, उदया काय घडेल कुणालाच माहित नसतं. तरीही आपण सगळे जगत असतो. जे घडेल त्याला सामोरे जात असतो. आयुष्यातील काही क्षण अगदी हवेहवेसे असतांना ते कधीच संपू नये असं वाटतं. पण ते कधी संपून जातात, हे कळत सुध्दा नाही. ते क्षण जेव्हा-जेव्हा आठवतात, तेव्हा मनाला आनंदित करून जातात. पण याविरुद्ध 'संकट' हे तर एक वादळच आहे. कधी आयुष्यात येऊन धडकतं कळतच देखील नाही, आणि इतक्या वेदना देऊन जातं, की त्या वेदना असाह्य होतात. ते वादळ सगळं आपल्यासोबत वाहून नेत असतं. कारण संकटात आपण एकटेच असतो. आपल्या बाजूला आपल्यासोबत फक्त आपले अश्रू आणि चिंध्या-चिंध्या झालेले हृदय असतं. हा सगळा मायेचा पसारा आहे. याला गुतूंन आपण आपल्याला त्या विहिरीत खेचून नेतो. तिथून वरती आपण कधीच येऊ शकत नाही. जोपर्यंत माणसाकडे पद, पैसा, प्रतिष्ठा असते, तोपर्यंत आपल्या आजूबाजूला सगळी लोकं मागेपुढे करत असतात. पण जेव्हा आपण शून्य होतो, त्यावेळेला आपल्या सोबतची माणसंसुध्दा भावनाशून्य होतात. अशावेळेला आपल्याला समजून घेणारं कोणीच नसतं. अशा घटना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात घडत असतात.

हे सगळं विश्वच त्या परमेश्वराने बनवलं मग अशी वेगवेगळी परिस्थिती, माणसं त्यानेच बनवलेली असावी का? असा प्रश्न मनात पडतो. त्याने फक्त माणसं बनवली, स्वभाव, मन हे तर सगळं माणसांच्या इच्छेनुसारच चालत आसेल ना! मग माणसच माणसांना समजून घेतांना कमी पडतात का? म्हणून सुख-दुःख येतात. हे आयुष्याचे कोडे कुठे सुटेल? कोण सोडवेल? कोणास ठाऊक?

असंख्य प्रश्नांचा पसारा त्यात ही संकटे, आयुष्यात जगायच कसं? हा मार्गच दिसत नाही. कधी हा मार्ग मोकळा होईल, की त्याअगोदर 'आयुष्याची यात्राच' संपून जाईल? जगावं कसं? वागावं कसं? हेच कळत नाही. यशाच्या शिखरावर चढतांना जवळ गेल्यावर हात घसरण्याची भिती असते, का सहज सुटत नसावी ही सगळी प्रश्न. का इतका संघर्ष? याचा विचार करावा लागतो, सगळं काही करताना काहीच मिळत नाही. सगळ्यांसोबत असं होत असेल का? मीच कुठेतरी कमी पडतोय? हा प्रश्नच कधी सुटत नाही.

हे 'परमेश्वरा' कधीतरी अशा वेळेला हात थांबवायला येशील का रे? माझी हाक तुझ्यापर्यंत पोहचेल का रे? सांग ना केव्हापर्यंत या संकटांशी खेळायचं आहे. आता खूप थकल्यासारखं वाटतंय रे! इतका अंत नको पाहू रे बाबा, माहित आहे कोणत्या तरी चुकीसाठी तुझी ही 'शिक्षा' आहे. पण शिक्षा देखील कधी तरी संपते ना! का ही 'जन्मठेप' आहे रे..? सांग ना! सांग ना! तुझ्या बाळाची हाल अपेष्टा पाहतांना तुला वाईट कसं वाटत नाही रे?

येऊन मुक्त करून जा या संकटातून येवढेच मागणे आहे रे आता. असेच आमचे सगळ्यांचे आयुष्य सुरू आहे. सगळ्यांची नुस्ती पळ-पळ सुरू आहे. याचेच नाव आयुष्य आहे. असच काहीतरी असावं हे मात्र नक्की. सगळ्यांनी एकमेकांना सहकार्याने जगण्याची बृद्धी दे रे देवा. नाहीतर प्रत्येक व्यक्ती आपापल्या आयुष्यात गुंतून- गुतूंनच संपून जाईल. आपण स्वतःच दुःखीतांच्या आयुष्यात जाऊन डोकावले तर आणि आशेचा एक दिवा लावला तर ह्रदयात नक्कीच प्रकाश पडेल. असे मला मनापासून वाटते.

आयुष्य तर सगळेच जगत आहेत, पण त्यात आनंद कुठून आणायचा. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. जिथे सुख, शांती, समाधान, समृद्धी, प्रेम आहे. तिथेच आनंद असतो. मग मन शांत असेल तर-सुख-शांती मिळेल, मनाला वळण लावल्याने समाधान मिळेल, निरंतर श्रम करत राहिल्याने समृद्धी मिळेल, आणि हे सगळे मिळाल्यानंतर प्रेम आपोआपच धावत येऊन आपल्याला मिठीत घेईल. याचेच नाव बहोतेक आयुष्य असावे.

लढा आहे आयुष्याचा 
थांबून चालणार नाही
थकलो जरी आपण
वेळ कधीच थांबणार नाही

लढा आहे आयुष्याचा 
शांत राहून चालणार नाही.
प्रश्न आपले मांडल्याशिवाय
ते कधीच सुटणार नाही...

लढा आहे आयुष्याचा
चुकलं तर चालणार नाही
कुठे तरी सूत्र मिळवावे लागेल
आयुष्याचे गणित तसे सुटणार नाही

लढा आहे आयुष्याचा
वाट सोडून चालणार नाही
नदीच्या प्रवाहात वाहण्याशिवाय 
समुद्र कधीच मिळणार नाही...

लढा आहे आयुष्याचा 
प्रयत्न केल्याशिवाय शक्य नाही.
नुसता विचार करत बसल्याने 
यश कधीच मिळणार नाही...

लढा आहे आयुष्याचा
दुःखी राहून चालणार नाही
समाधानी राहिल्याशिवाय
सुख कधीच मिळणार नाही.

manisha-maher

सौ. मनीषा संदिप बैनाडे-महेर,
परसोडा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद