चंद्र एकच नभात आहे
सूर्य ही रोज तो एकच उगवतो
डोही वर ही एकच आसमान
एकट्यापणास मग का तू घाबरतो..?
डोंगरदऱ्यातून शोधत मार्ग
सागरमिलनासाठी नदी ही एकटीच वाहते
नाही मिळाली साथ तुला कुणाची
म्हणून का मग तुझी दिशा भटकते..?
करुनी संघर्ष काट्यांशी
एकटीच छोटीशी कळी उमलते
जीवनातील छोट्याशा वादळात
स्वविश्वासाची नाव मग का डगमगते..?
करण्यास रात्रीचा काळोख दूर
दिव्यात तेवणारी वात ही एकटीच जळते
एकटेपणा आपोआप दूर होतो
ज्ञानाच्या प्रकाशाने जेव्हा अंतकरण उजळते
असला प्रवास जरी कितीही लांबचा
तरी वाट ही एकच असते
होऊन समरस सर्वांशी जगता आले
जीवनी त्याच्या एकट्यापणास मग कोठे जागा उरते
पुनम सुलाने..
हैदराबाद