जन्म-मरणाचा फेर मराठी कविता Marathi Kavita, Poem

माणसाने कुठल्याही गोष्टीचा गर्व न करता मृत्यू हा अटळ आहे हे लक्षात ठेवावं

जन्म-मरणाचा फेर मराठी कविता Marathi Kavita, Poem

नेत्री आसवांचे येतील पूर!
जेव्हा घेण्या येईल ईश्वर!

हरी नामाचा चालला नामघोष! 
मावळली जेव्हा प्राणज्योत!

नव्हती देवा सुध बुद्धीस माझ्या!
देहाचा विसर होत गेला

मागणे हेचि एक देवा तुझपासी!
येईल शरण तुझसी आकस्मित

भोळी होती देवा तुझवरी भक्ती!
घेतले मी नाम मुखी यथाशक्ती

टाळ मृदुंगासोबत नाम विठ्ठलाचे!
मंत्रमुग्ध भक्तगण हेचि सुख साचे 

जात होत्या लहरी आसमंती!
हरीने दिली देहास अनूमती

घेतले बोलाऊन देवा तू वैकुंठाला!
लाभली संत संगती या देहाला

भक्ती हाच धर्म म्हणूनी भजनी!
नर देहा सार्थक केले विठूचरणी

जात, गोत, वित्त नाही नेले संगे!
सत्य दाविले उदाहरण मनोमार्गे

नको मानवा बांधू गर्वाचे घर!
चुकणार नाही जन्म-मरणाचा फेर


सोनाली रामलाल रसाळ 
कापूसवाडगाव, ता. वैजापूर