अंधारात दिवा जळे
उजेडण्या परिसर
वात सोबती दिव्याची
सुखदुःखा बरोबर
स्वतः जळून वातीने
साथ दिली त्या दिव्याला
मिणमिण प्रकाशाने
उजळती भविष्याला
जळतांना होई त्रास
तिच्या समस्त अंगाला
काया कोमल असून
प्रकाशिते ती जगाला
सांगा कसा रे लावावा
तिच्या त्यागाचा हिशोब
प्रकाशिते जगा तरी
नाही तिला काही लोभ
शिकवण देई आम्हा
त्याग जळत्या वातीचा
व्हावे तुम्हीही काजवा
येता अंधाऱ्या रातीचा
सौ. अल्का धोंडणे-साखरे, संभाजीनगर