जन्म देणारी माय माझी
मी मातीचा गोळा
नकोसा जन्म माझा तरी
तिने मनविला सोहळा
लेक नको होती
हा आघात सहन करुनी
सासुरवास होता तरी
जिरविले डोळ्याचे पाणी
आई माझी लाख अडाणी
दिले तरी संस्कार
माते तुझा पोटी जन्मले
नाहीच फिटणार उपकार
मायच्या काळजाचे होई पाणी
तिला मी दिसे दीनवाणी
लाख यातना सहन करुनी
हाती दिली लेखणी
गरिबीचा वणवा असून ही
नाही बसू दिले चटके
घेई लेकराला नवीन वस्र
स्वतःचे मात्र फाटके
माय आक्रोश करी मनात
तरी चेहरा सदैव हासरा
दुःख ओतूनी फुलात
बनवित असे सुगंधी गजरा
नाही मिळाले डोरले तिला
अन् नाही जोडवे बुगड्या
मायेने माझ्या लेऊनी हाती
काचकडीच्या बांगड्या
माय माझी शिनभाग हरवी
पाहूनी माझा चेहरा
सासर हेच सुख मनुनी
नाही गेली कधी माहेरा
माय माझी भरवी मला
चिमणीसारखा मऊ मऊ चारा
तिला मात्र नेहमीच
शिळ्या भाकरी अन् चटणीचा आसरा
नाही विसावा जीवाला तिच्या
नाही मनी कसलेच वर्म
यातनेचाच शृंगार करुनी
माय करे नित्य कृषी कर्म
"एकच मागणे देवा तुला,
सुखी ठेव तिला
जिने जन्म दिलाय मला...!
सोनाली रामलाल रसाळ,
कापूसवाडगाव ता. वैजापूर