माझा कानडा विठ्ठल,
युगे अठ्ठावीस उभा,
भाव भक्तीचा भुकेला,
राऊळाची दिसे शोभा ॥१ ॥
आहे आराध्य दैवत,
वारकरी संप्रदाया,
गोरगरिबांच्या देवा,
शिरावर कृपाछाया ॥ २ ॥
नाम गाऊ विठ्ठलाचे,
भक्तगण होती गोळा,
आषाढीला, कार्तिकीला,
दिसे अद्भुत सोहळा ॥ ३ ॥
मुख पाहता देवाचे,
हरपते देहभान,
टाळ, मृदंग वाजता,
डोलताहे तनमन ॥ ४ ॥
करू भजन, किर्तन,
जाऊ भक्तीत रंगून,
माऊलीच्या स्मरणात,
रात्र काढूया जागून ॥ ५ ॥
थोर नामाचा महिमा,
वेड लाविले या जीवा,
प्रभु धावूनिया येतो,
संकटात रक्षावया ॥ ६ ॥
श्रीम. पल्लवी जयप्रकाश चव्हाण
(सहशिक्षिका)
परंडा, जि. उस्मानाबाद