प्रत्येक रंगाने तू
सौदर्यं खुलवतोस...
निर्मळ वस्त्र लेवून
हिरवळीने सजतोस...
नदी, धबधबा, समृद्रातून
खळखळून तू हसतोस...
भरभरूनच सदा जगावे,
निश्चल औदार्य तू दावतोस...
ऊन, हिवाळा, पावसाळा
सर्व झेलूनही तटस्थ राहतोस
जीवन सुंदर करण्यासाठी
विचारांचे जणू बीज पेरतोस
पक्ष्यांच्या मंजूळ आवाजाने
मनाला मंत्रमुग्ध तू करतोस...
वा-याच्या हलक्या लहरींनी
अंतर्मनाला साद घालतोस...
प्रातःकाळी आकाशामध्ये
विविधरंगी छटा उधळतोस
क्षितिजावरती सूर्य मावळता
चंद्र-ता-यांची आरास मांडतोस
पावसाच्या हलक्या सरींनी
सृष्टीत नवचैतन्य फुलवतोस...
इंद्रधनुच्या सप्तरंगी तोरणाने
डोळ्यांचे पारणे तू फेडतोस...
किती अनुपम हे निसर्ग सौंदर्य
सुखशांतीची अनुभूती देतोस...
ऋतूचक्र परिवर्तन किमयेने
सृष्टीचा कायापालट करतोस...
उज्ज्वला कोल्हे, कोपरगाव