हल्ली 'चोर' सन्मानित होतात...

स्नेहा कोलगे लिखित मराठी कविता हल्ली 'चोर' सन्मानित होतात...

हल्ली 'चोर' सन्मानित होतात...

जास्त लिहीत जाऊ नको
शब्द चोरीला जातात..
काना, मात्रा, वेलांटी..
स्वर, व्यंजन..
भीतीखाली वावरतात... 

चलता हैं यार!... 
मनाला लावून घेणं..
नुसताच.. 
अवाजवी प्रतिक्रियेचा 
प्रकार... 

हल्ली 'चोर' सन्मानित होतात...

भीती... 
मान खाली घालून 
असते वावरत...
कागद राहतात कोरेच ...
वाऱ्याकडे न्याय मागत

बंड पुकारणारे 
नेहमीच असतात...
होत जातात 'व्यक्त'
भीड न बाळगता...

समजावत कोणीतरी...
आता विचारात 'राम' नाही उरला... 
कामधंदा कर नीट..
मिळवं चार पैसे..
बँकेच्या पासबुकातले रुपये... 
खरे.. साहित्य...

उचलला जातो पेन
आपोपाप स्फुरत जाते
'कविता'...
जन्मासाठी आसुसलेली...

येते पिटविण्यात दवंडी...
'चोरांचा सुळसुळाट फार आहे'..
उघडे ठेवतो...  विचारांचे घर-दार...
बघू...  त्यांच्या चौर्यास 
कितीशी धार आहे...

Sneha Kolge

स्नेहा कोळगे, मुंबई