पिंजरा मराठी कविता

स्नेहा कोलगे लिखित मराठी कविता पिंजरा

पिंजरा मराठी कविता

त्याने संशय घेतला
तिने घर सोडले
त्याने हात उचलला
ती कायमसाठी माहेरी आली
तो व्यसनी आहे हे कळले
तिला ती फसवणूक वाटली
ती शांतपणे दूर झाली...
त्याचा पाय घसरला
प्रतारणा वाटली, ती सोडून गेली...

त्या सगळ्याजणी...
चौकटीतून बाहेर पडल्या...
टीका झाली
शांत राहिल्या
स्वतःच अस्तित्व
स्वतःच व्यक्तिमत्त्व
घडवत राहिल्या
लोकांनी.. टाळ्या वाजवल्या
त्यांच्या मुलाखती घेतल्या
नव्या पिढीला त्या 'आदर्श' वाटल्या...

पण,
चुकीच्या चौकटीतून
बाहेर न पडलेल्या ...
त्या 'चारचौघींना'...
'अस्पृश्य' वाटतात...
त्यांच्या 'चर्चेचा' 
प्रिय विषय ठरतात...

जेव्हा समोर येतात
तेव्हा मात्र,
त्यांच्या मध्ये...
स्वतःच.. हरवलेलं
जगणं शोधत राहतात...
जगणं शोधत राहतात...

(काही पिंजऱ्यांना आतून टाळे लावलेले असतात...)

Sneha Kolge

स्नेहा कोळगे,
(मनोविश्लेषक)
मुंबई